मुलीची कौमार्य चाचणी करणाऱ्या गायकावर डॉक्टरांची टीका

1392

अमेरिकन रॅपर गायक आणि अभिनेता टीआयने आपण आपल्या मुलीची दरवर्षी कौमार्य चाचणी करत असल्याचे एका मुलाखतीत सांगितल्यानंतर त्याच्या या विधानाने नवा वाद सुरू झाला आहे. टीआयच्या या वक्तव्याचा निषेध करत डॉक्टरांनी त्याच्यावर टीका केली आहे. अशा प्रकारची चाचणी करणे म्हणजे महिलांच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. अशा चाचण्यांमुळे महिलांचा अपमान होत असून त्यांची कुचंबणा होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

कौमार्य चाचणीला कोणताही वैद्यकीय आधार नसून महिलांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हायमन टेस्ट किंवा टू फिंगर टेस्टद्वारे कौमार्याबाबत अंदाज व्यक्त करण्यात येतो. मात्र, याला कोणताही वैद्यकीय आधार नसून महिलांच्या शरीराबाबतच्या अयोग्य समजामुळे आणि जुन्या चुकीच्या समजुतीमुळे अशा चाचण्या करण्यात येतात. आपल्या मुलीने सेक्स केला आहे की नाही, याबाबत अनेक पालक चिंतेत असतात. त्यामुळे पालकांकडून मुलींची कौमार्य चाचणी करण्यात येते. मात्र, हे अयोग्य असल्याचे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॉरेंसिक नर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिफर पियर्स यांनी सांगितले. अशा चाचणीसाठी पालक येतात, तेव्हा अशा चाचणीतून मुलीच्या कौमार्याबाबतची माहिती मिळू शकत नाही. याबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मुलींच्या हायमनवरून त्यांच्या कौमार्याची चाचणी करण्यात येते. मात्र, काही वेळा खेळांमुळे, सायकल चालवणे, गिर्यारोहण यामुळे हायमनला नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा चाचण्यांमुळे कौमार्याबाबत निष्कर्ष काढणे अयोग्य असल्याचे महिलांच्या आरोग्याबाबतच्या अभ्यासक जेनिफर गुंटेर यांनी सांगितले. फक्त सेक्स केल्यानेच हायमनला नुकसान होते, या समजाला वैद्यकीय आधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही महिलांमध्ये अनेकदा सेक्स केल्यानंतरही हायनम सुरक्षित असते. मात्र, खेळ, सायकल चालणे, गिर्यारोहण यासारख्या गोष्टींमुळे हायमनला नुकसान होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कौमार्य चाचणी कोणत्याही महिलेसाठी अपमानजनक असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. काहीवेळा चाचण्यांमुळे त्यांना आरोग्याच्या समस्याही होऊ शकतात, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले. काही समाजामध्ये लग्नाआधी मुलीची कौमार्य चाचणी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र, त्याला कोणताही आधार नसल्याने याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. अशा चाचण्यांमुळे मुलींमध्ये सेक्सबाबत अयोग्य भावना निर्माण होऊन त्याचा मानसीक परिणाम होण्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली. एका प्रसिद्ध गायकानेच आपण मुलीची दरवर्षी कौमार्य चाचणी करत असल्याच्या विधानाने खळबळ उडाली असून डॉक्टरांनी गायकावर टीका करत समाजात जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या