सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा संप सुरूच, 250पेक्षा जास्त डॉक्टरांचा समावेश; रुग्णसेवा थंडावली

सोलापुरात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांनी संप सुरू केला असून, त्यामुळे रुग्णसेवा थंडावली आहे. संपाचा दुसरा दिवस असून, शासनाने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप सुरू करू, असा इशारा निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी दिला आहे. या संपात 250हून अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांत निवासी डॉक्टरांना एक लाखापेक्षा जास्त मानधन आहे. महाराष्ट्रात मात्र 70-80 हजार रुपये मानधन दिले जाते; पण तेही दोन-दोन मिळत नाही. मानधनासह निवासव्यवस्था व सुधारणा यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. शुक्रवारपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. शनिवारी सकाळी ‘बी ब्लॉक’समोर निवासी डॉक्टरांनी एकत्र येत ‘योग्य काम, योग्य वेतन द्या’ अशा घोषणा करीत परिसर दणाणून सोडला होता.

आम्ही सध्या ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा सुरळीत असून, जर आमच्या मागण्यांवर शासनाने लवकरात लवकर विचार न केल्यास सर्व सेवा थांबवू, असा इशारा ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण मनवर यांनी दिला आहे. यावेळी डॉ. मनोहर, डॉ. युगंधर टोक, जगदीश मोहोळ, यास्मिन मुख्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा प्रभावित झाली आहे.