डॉक्टरांना मारहाण प्रकरण; दीड हजार डॉक्टरांनी ठेवली रुग्णालये बंद

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

डॉक्टरांवर वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी व उद्या शनिवारी शहरातील सर्व खाजगी रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडीकल असोसीएशनने घेतला. त्यानुसार हा बंद दोन दिवस जिल्हाभर असून आज व उद्या सर्व खाजगी रुग्णालये व दवाखाने कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली असून रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

शहरातील डॉ. मेहेर यांच्यावर हल्ला होण्याच्या निषेधार्थ येथील हॉस्पीटल कर्मचारी व नर्सेस संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन होणार्‍या हल्ल्यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. खाजगी किंवा शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टर किंवा कर्मचार्‍यांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून किंवा काही असामाजिक तत्त्वांकडून हल्ले होण्याचे प्रमाण दिवसागणीक वाढत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत असून डॉक्टरांना रुग्णसेवेचे काम करणे अवघड झाले आहे. शिवाय असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करण्यता यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर रुग्णालय कर्मचारी संघटनेचे शरीफ शहा सुलेमान शहा, पंजाबराव आडवे, भिमराव धुरंदर, शोएब शेख, परमेश्वर फरपट, राजेंद्र सुसर, आदींच्या स्वाक्षर्‍या आहे. या संदर्भातील एक निवेदन इंडियन मेडीकल असोसीएशनच्या वतीने ठाणेदारांना देण्यात आले. सध्या साधीच्या रोगांचा पैâलाव होत असून रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा रुग्णांची रुग्णालयात गर्दी असल्याने रुग्णालये बंद काळात रुग्णांचे हाल होत आहे. हा बंद दोन दिवस जिल्हाभर असून आज शुक्रवारी व उद्या शनिवारी सर्व खाजगी रुग्णालये व दवाखाने बंद राहणार आहे.