प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही! सतत टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे काैतुक कोणी घरच्यांनी केले नसले तरी जगभरातून त्याचे काैतुक झाले. सर्वोच्च न्यायालयाने त्या कामाचे काwतुक केले. काैतुकासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून महापालिका आपली कामे करत असताना जरा कुठे खूट झाले की दूषणे देण्यासाठी अनेक जण उभे राहतात. नगरसेवक काय करताहेत, महापौर काय करताहेत, आयुक्त काय करताहेत, हे प्रश्न उभे केले जातात. पण त्यांना मला विचारायचेय, तुम्ही स्वतः काय करताय ते आधी सांगा. स्वतः काही करायचे नाही आणि प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारणे सोपे असते आणि प्रश्न विचारायला अकलेची गरज लागत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिकेच्या कामावर सतत टीका करणाऱया विरोधकांना फटकारले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या ‘व्हॉटस्अॅप चॅट बॉट’ सुविधेचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन महापालिकेच्या या सेवेचे लोकार्पण केले. या वेळी महापालिकेच्या कामाचे काैतुक करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला अभिमान आहे ही आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील क्रमांक एकची महापालिका आहे. क्रमांक एकचं शहर आहे. या महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ‘व्हॉटस्अॅप चॅट बॉट’ सुविधेमुळे जनतेची साधी-साधी कामे मग ते जन्मदाखले असतील किंवा इतर काही कामे वर्क फ्रॉम होम होतील. मला अभिमान काटतोय की, माझी महापालिका या तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी करते आहे.

महापालिका कार्यालयात तीळगूळ न देतासुद्धा काम होणारच

मकर संक्रांतीचा मुहूर्त आहे म्हणून तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोला हे आज म्हणणे योग्य आहे. कारण महापालिकेच्या या सुविधेमुळे तीळगूळ न देताच लोकांची कामे होणार आहेत. पण एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो… सरकारी, महापालिका सर्वच कार्यालये आली यात. तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणंदेखील खूप अवघड मानलं जातं. लोकांना वाटते – हे माझे सरकार, माझी महापालिका आहे. पण साधा संवादसुद्धा होत नाही लोकांशी. किती वेळा बोलणार, किती वेळा पत्र लिहिणार, असा प्रश्न त्यांना पडतो. लोकांची साधी साधी कामे असतात, परंतु ती करणे तर बाजूलाच राहिले, पण साधे उत्तरदेखील मिळत नाही. अशा वेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येते. काय याला अर्थ आहे… मी कर भरतो, मी मत देतो, सर्व करतो. पण मत मागताना जी लोपं झुकलेली असतात, ती मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात. असे होता कामा नये. जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून ही कामे आपण करीत आहोत. तीळगूळ न देतासुद्धा काम होणारच हा विश्वास जनतेमध्ये निर्माण व्हायला हवा आणि या महापालिकेच्या सेवेमुळे तो निर्माण होईल. हे महापालिकेने टाकलेले क्रांतिकारक पाऊल आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

आमच्या कारभारात लपवाछपवी नाही, सर्व आहे ते उघड आहे!

मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करून आपण या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली. त्यानंतर कालपरवा कोस्टल रोडचं जे कामादरम्यान ‘मावळा’ यंत्राने केलेल्या कामगिरीचे थेट प्रक्षेपण आपण पाहिले. अनेकदा असं होतं की, कामं न करता बोलणारेदेखील अनेक लोक आहेत. तर काही लोक काम करतात, पण बोलतच नाहीत. मग त्याला आपण असे म्हणतो की, जंगल में मोर नाचा किसने देखा… तर आपण सर्व जगाला दाखवतोय की, आम्ही काय करतोय आणि आमचा कारभार हा अत्यंत उघड आहे. यात लपवाछपवीसारखे काहीच नाही. जे काय आहे ते तुमच्या सेवेसाठी आम्ही करत आहोत. तुमच्या सेवेसाठी करताना लपवाछपवी कशाला हवी. जे आहे ते सर्व महापालिकेच्या साइटवर जा आणि आता व्हॉटस्अॅपवर तुम्हाला ते उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

माझ्या टीममुळेच मी लोकप्रिय मुख्यमंत्री

लोकप्रिय मुख्यमंत्री जे म्हटले जाते ती लोकप्रियता माझ्या एकटय़ाची असू शकत नाही. जोपर्यंत टीम साथ देत नाही तोपर्यंत एकटा कॅप्टन काही करू शकत नाही. माझे सर्व खेळाडू मग ते महापालिकेतले कर्मचारी, आयुक्त, माझे सरकारमधील सर्व मंत्री, कर्मचारी यांनी जर खांद्याला खांदा लावून साथ दिली नसती तर मुंबईचे काैतुक जागतिक स्तरावर झाले नसते, अशा शब्दांत आपल्या सर्व सहकाऱयांचे काwतुक करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढच्या कोणत्याही कामासाठी सरकारचे जिथे जिथे सहाय्य लागेल तिथे विनासंकोच सांगा. कोणताही विलंब न लावता ते तुम्हाला दिले म्हणून समजा, असे आश्वासन मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांना दिले.

महापालिका नेमके काय करते हे जनतेला कळू द्या!

मुंबई महापालिका आशियातील सर्वात मोठी महापालिका आहे. पण या महापालिकेचे नेमके काम काय आहे. ही सर्वात मोठी महापालिका गटारे साफ करते, रोज पाणीपुरवठा करते, कचरा उचलते, धरणे बांधण्यापासून ते आताचे हे व्हॉटस्अॅप चॅट बॉटपर्यंतच्या सुविधा पुरवते आहे. महापालिका आपले कर्तव्य बजावत असताना ही सर्व कामे जनतेला कळणे महत्त्वाचे आहे. यातून नागरिकांकडूनही महापालिकेच्या काय अपेक्षा आहेत, हेही आपल्याला सांगता येईल. त्यामुळे या सर्वांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.