
देशभरातून विविध ठिकाणी पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना आंबेगावात घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे तेरा वर्षीय मुलगी मैत्रिणीबरोबर कराटे प्रशिक्षणाला जात असताना एका पाळीव कुत्र्याने हल्ला करत अनेक ठिकाणी चावा घेऊन जखमी केले आहे.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी जयराम लबडे (13) ही शाळकरी मुलगी इयत्ता 7 असून ती दि.19 रोजी सकाळी 7 वा मैत्रीण अक्षदा वणवे हिच्या सोबत गावातील पांडुरंग मंदिरात कराटेच्या प्रशिक्षणाला जात असताना त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेले युवराज लबडे यांच्या कुत्र्याने वैष्णवी जयराम लबडे हिच्यावर हल्ला करत तिच्या दोन्हीं पायांना, पोटरीला चावा घेत तीला जखमी केले. मुलीने जोरजोरात आरडा ओरडा केला तिच्या समवेत असणारी मैत्रीण तीला घरी घेऊन आली, तीला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सदर कुत्रा हा या अगोदरही वैष्णवी हिचे लहान बहीण तृप्ती लबडे, व आजोबा हारहू नानाभाऊ लबडे, यांना चावलेला असल्याचे फिर्यादी रेणुका लबडे यांनी सांगितले. तसेच कुत्रा असलेल्या कुटुंबास वारंवार सांगूनही युवराज लबडे यांनी कुत्रा मोकळा सोडून फिर्यादीचे मुलीच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने कुत्रा पाळणारे युवराज काशिनाथ लबडे यांच्यावर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारगाव पोलीस करत आहे.

























































