
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरातील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. केडीएमसीमधून २७ गावे वगळून स्वतंत्र पालिकेबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने डोंबिवलीत आंदोलन पेटले आहे. आज मानपाडा चौकात सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीने ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘एक दो, एक दो… केडीएमसी फेक दो’ अशा जोरदार घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ठ असलेल्या २७गावांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत विकासकामे मात्र ठप्प झाल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे २७ गावांना स्वतंत्र नगरपालिका द्यावी, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका हा प्रश्न केवळ राजकारणाचा नसून लोकहिताचा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या न्याय्य मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मानपाडा चौक परिसरात सकाळपासूनच गावकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. आंदोलनात भिवंडीचे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, मुकेश पाटील, किरण पाटील, भाजप आमदार किसन कथोरे, काँग्रेसचे संतोष केणे यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तासभर वाहतूक खोळंबली
आंदोलनकर्त्यांनी मानपाडा चौकातच ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजी, फलक आणि बॅनर यांनी संपूर्ण चौक परिसर गजबजून गेला होता. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना बाजूला केल्याने मानपाडा रोडवरील तासभर खोळंबलेली वाहतूक नंतर सुरळीत झाली.
२७ गाव संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय लागेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. यासाठी गरज भासल्यास आणखी मोठे जन आंदोलन उभारले जाईल. – सुरेश म्हात्रे





























































