
सामना प्रतिनिधी । मुंबई
कारवार कोकण मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत कळवा, ठाणे, डोंबिवली, मुलुंड, अंधेरी, नवी मुंबई व मुंबई येथील कोकण मराठा समाजातील 9 क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. त्यात डोंबिवली संघाने अंतिम सामन्यात कळवा संघाचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.
कांदिवली लोकमान्य टिळक मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ दै. ‘सामना’चे सहाय्यक संपादक प्रभाकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक उदय नाईक, पोलीस निरीक्षक रवी अडाणे, विजय कांदळगावकर, प्रवीण राणे, संपतराव पाटील, विजय पाटणेकर, लाडे आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण मराठा मंडळाचे निळोबा नाईक, सतीश नाईक, अमित राणे, उमेश साळुंके, रमाकांत राणे, सागर देसाई आदींनी विशेष परिश्रम घेतले.





























































