
छेड काढली म्हणून एका महिलेने कार्यालयात घुसून चपलेने चोपलेल्या मिंधे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगलेवर दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रास देऊन छेडछाड केली म्हणून एका महिलेने उगले याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उगले याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन महिन्यांपूर्वीही त्याच्याविरोधात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मिंधे गटाचे माजी नगरसेवक हे गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत आहेत. त्याने अनेक वेळा अश्लील शेरेबाजी करून छेडही काढली आहे, असे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. उगले याच्याकडून होणारा त्रास सहन न झाल्यामुळे याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नाइलाजास्तव तक्रार करावी लागली असेही या पीडित महिलेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पोलिसांनी उगलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे याआधी दोन महिन्यांपूर्वीदेखील अशाच स्वरूपाच्या प्रकरणात उगले याला एका महिलेने भररस्त्यात चपलेने चोप दिला होता. तेव्हाही त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता पुन्हा उगले यांच्यावर नव्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. माजी नगरसेवकावर लागोपाठ विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल झाल्याने मिंधे गटात एकच खळबळ उडाली आहे.