27 गावांच्या स्वतंत्र नगर परिषदेबाबत सुनावणीनंतर निर्णय,नगरविकास मंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-shinde

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या 27 गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबतच्या अधिसूचनेवरील हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे आज आणि उद्या अशी दोन दिवस सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. सरकार याबाबतीत सकारात्मक असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, त्या 27 गावांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच बोलावलेल्या सर्व संबंधितांच्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. तेथेही उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 27 गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यासंदर्भात 11 व 12 मार्च रोजी सुनावणी सुरू असून या सुनावणीसंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवाल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत तातडीने निर्णय घेतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.