गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘हम साथ साथ है’अभियान; डोंबिवलीत 23 कश्मिरी तरुणींचे ‘स्वागत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

गुढीपाडवा प्रेम वाढवा.. नववर्षाचा हा संदेश स्नेह जागवा.. असे कवी राजीव जोशी यांनी आपल्या गाण्यामध्ये म्हटले आहे. तोच अनुभव शनिवारी निघणाऱया यंदाच्या स्वागतयात्रेच्या निमित्ताने कश्मीरमधील 23 तरुणी घेणार आहेत. ‘हम’ या संस्थेने या मुलींना खास आमंत्रित केले असून मराठमोळ्या सणात ते सहभागी होणार आहेत. ढोलताशांचा निनाद.. भगवे झेंडे.. आणि गुढी उभारण्याचा पवित्र सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ त्यांना पाहता येणार आहे. मराठी सण, उत्सव तसेच खाद्यसंस्कृती याचाही अभ्यास करता येईल. दहशतवादाच्या सावटाखाली जीवन जगणाऱया या कश्मिरी मुलींना प्रथमच राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव घेत मोकळा श्वास घेता येणार आहे.

स्वागतयात्रेची परंपरा महाराष्ट्रात सर्वप्रथम सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत सुरू झाली. त्यानंतर सर्वच महानगरांमधून दरवर्षी स्वागतयात्रा काढण्यात येते. राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने यंदाच्या स्वागतयात्रेत कश्मीरमधील मुलींना सहभागी करून घेतले जाणार आहे. 5 ते 8 एप्रिल असे चार दिवस या मुलींचा डोंबिवलीत मुक्काम राहणार असून त्यांची राहण्याची व्यवस्था विविध 18 कुटुंबांमध्ये केली जाणार आहे. जम्मूमधील ‘सेवा भारती’च्या  छात्रालयात शिकणाऱया या मुली असून डोंबिवली दौऱयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कश्मीरमधील दहशतवादाच्या छायेत वावरणाऱया या मुली पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱया असून प्रथमच ते कश्मीर सोडून महाराष्ट्रासारख्या दुसऱया राज्याला भेट देणार आहेत. डोंबिवलीत आल्यानंतर त्यांना मराठी सण तसेच गुढीपाडव्याचे महत्त्व आणि स्वागतयात्रेची परंपरा याविषयीची माहिती दिली जाणार आहे. तसेच कश्मीरमधील मुलीदेखील स्थानिक परंपरा , खाद्यसंस्कृती, पेहराव आणि संस्कृती याची माहिती डोंबिवलीकरांना देतील.

मुंबई दर्शनही घडवणार

स्वागतयात्रेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कश्मीरमधून आलेल्या 23 मुलींना मुंबई दर्शनही घडवले जाणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी विविध ठिकाणची सफर या मुलींना घडविण्यात येईल, अशी माहिती ‘हम’ संस्थेचे सुनील देशपांडे यांनी दिली.