सोमवारी दांडी, मंगळवारी स्वातंत्र्य दिन; ‘लाँग विकेंड’मुळे विमानांच्या तिकिटांच्या किमती आभाळाला

airoplane

स्वातंत्र्य दिनाच्या आधी येणारा शनिवार व रविवारमुळे काही मार्गांवर देशांतर्गत विमान तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या वर्षी 15 ऑगस्ट हा मंगळवारी असल्याने, अनेकांनी सोमवारी सुट्टी घेऊन शनिवार ते मंगळवार या चार दिवसांच्या लाँग विकेंडचा अनेक जण प्लान बनवत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिर्डी आणि तिरुपती यांसारख्या धार्मिक स्थळांसोबतच मुंबई आणि दिल्लीपासून प्रसिद्ध सुट्टीची ठिकाणे आणि गोवा, आग्रा, कोची, मदुराईला जाण्यासाठी विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

मात्र श्रीनगर सारख्या ठिकाणांच्या विमानांच्या तिकिटांचे दर तुलनेने कमी राहिले आहेत. बुधवारी सकाळी, मुंबई ते श्रीनगर या सर्वात स्वस्त 48 तासांच्या आगाऊ नॉन-स्टॉप फ्लाइटची किंमत ₹ 9,500 आहे. हे सर्वात व्यस्त देशांतर्गत मार्ग – मुंबई-दिल्ली या विमानभाड्याइतकेच होते.
मुंबई-श्रीनगर विमानभाडे मात्र त्या दिवशी संध्याकाळपर्यंत ₹12,500 पर्यंत वाढले, परंतु मुंबई-दिल्ली मार्गासाठी ते सारखेच राहिले.

या लाँग वीकेंडला लोक धार्मिक पर्यटन स्थळांकडेही जाताना दिसत आहेत या कारणाने या मार्गांवरील तिकिटांच्या किमती वाढल्या आहेत. मुंबईहून प्रसिद्ध बालाजी मंदिरासाठी ओळखल्या जाणाऱ्या तिरुपतीच्या सर्वात स्वस्त विमान तिकिटाची किंमत ₹ 18,000 आणि दिल्लीहून ₹ 25,000 इतकी होती. हे 48-तास आगाऊ खरेदीचे भाडे आहेत. जून-जुलैमध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशांना 20%-25% स्वस्त दरात हे तिकीट मिळालं असतं, असं एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्यानं TOI ला सांगितलं.

या वर्षी जूनमध्ये, एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया-पॅसिफिकने फ्लेअर एव्हिएशन कन्सल्टिंगच्या सहकार्यानं या देशांतर्गत विमान भाडे ट्रेंडवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हिंदुस्थानात कोविड नंतर विमान भाड्यात सर्वाधिक 41% वाढ झाली आहे.

2023 च्या पहिल्या तिमाहीत हिंदुस्थान, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियासह इतर अनेक बाजारपेठांमध्ये देशांतर्गत विमान भाडं वाढत असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.