
हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम आमच्या देशाचा नागरिक कधीही नव्हता आणि आताही नाहीय, असे स्पष्टीकरण कॅरेबियन देश डोमिनिकन रिपब्लिकने केले आहे. आर्थिक नागरिकत्व योजनेनुसारही आम्ही दाऊदला नागरिकत्व दिलेले नाही. आमच्या देशाचा तो नागरिक असल्याचे वृत्त निराधार असल्याचे डोमिनिकाने स्पष्ट केले.
कॅरेबियन बेटातील डोमिनिकन प्रजासत्ताक या देशात उद्योग अथवा व्यापारासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस देशाचे नागरिकत्व बहाल केले जाते. त्यामुळे कराचीत तळ ठोकलेला गँगस्टर दाऊद इब्राहीम याने पाकिस्तानसह डोमिनिकन रिपब्लिकचेही नागरिकत्व मिळवले आहे अशा बातम्या पसरल्या होत्या. पण या वृत्ताचा डोमिनिकन सरकारने मात्र ठाम इन्कार केला आहे.आम्ही विदेशी व्यक्तीकडून आर्थिक गुंतवणूक स्वीकारताना त्या व्यक्तीच्या मिळकतीची पूर्ण शहनिशा करतो.त्यामुळे दाऊदसारख्या कुख्यात व्यक्तीला इकॉनॉमीक सिटिजनशिप प्रोग्रामद्वारे देशाचे नागरिकत्व बहाल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीय.मीडियाने दिलेल्या बातमीत आमच्या देशाचे नाव नाहक देण्यात आले आहे असा खुलासा डोमिनिकाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
दाऊदचा मुक्काम पाकिस्तानातच
कुख्यात दोन दाऊद इब्राहिमचा मुक्काम पाकिस्तानात कराची व अन्य शहरांत आलटूनपालटून असतो असे हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांनी स्पष्ट केले आहे. दाऊदने आपल्या पापाचा पैसा अनेक देशांत गुंतवून पाकिस्तान, हिंदुस्थान , दुबई आणि डोमिनिका प्रजासत्ताकाचे नागरिकत्व वेगवेगळे पासपोर्ट काढून मिळवल्याचे या गुप्तचर संघटनांचे म्हणणे आहे. मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहीम मुंबईच्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी आहे.या भीषण साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, तर 1400 नागरिक जखमी झाले होते.
या प्रकारांनंतर दाऊदने आपला मुक्काम दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानात आजपर्यंत ठेवल्याचे हिंदुस्थानचे म्हणणे आहे. पाकिस्तान मात्र दाऊद आपल्या देशात नाही असे खोटे वक्तव्य कायम करीत आला आहे.मात्र एफएटीएफ़ संघटनेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाकने आधी देशातील दहशतवाद्यांच्या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश केला होता.पण दुसऱ्या दिवशी लगेच पलटी मारत दाऊद आमच्या देशात नाहीच मुळी असे सांगितले होते. मात्र दाऊदला पाकिस्ताननेच आश्रय दिलेला आहे यावर हिंदुस्थान ठाम आहे.


























































