
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱयावर निघाले असतानाच अमेरिकेने आज हिंदुस्थानला मोठा धक्का दिला. हिंदुस्थानवर याआधीच लादलेला 25 टक्के टॅरिफ थेट दुपटीने वाढवत तो 50 टक्के करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेमुळे मोदी सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
ट्रम्प सरकारने मागच्या दोन महिन्यांपासून जगभरातील देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकणे सुरू केले आहे. हिंदुस्थानवरही त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावला होता. तसेच रशियाशी व्यापार करत असल्याची शिक्षा म्हणून दंड ठोठावण्याची घोषणा केली होती. मात्र हा दंड नेमका किती असेल हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नव्हते. हा दंड मोठा असेल असे त्यांनी वारंवार जाहीर केले होते. आज अखेर त्यांनी तो जाहीर केला. या घोषणेमुळे हिंदुस्थानी निर्यातीला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी उद्योग जगतात चिंतेचे वातावरण आहे.
अयोग्य, अन्यायी आणि अकारण
ट्रम्प यांच्या घोषणेवर हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने लगेचच प्रतिक्रिया दिली. जगातील इतर देश स्वतःच्या हितासाठी जे करतात, तेच हिंदुस्थान करत आहे. मात्र अमेरिका केवळ हिंदुस्थानला टार्गेट करत आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत अयोग्य, अन्यायी आणि अकारण घेतलेला आहे. हिंदुस्थान स्वहितासाठी योग्य ती पावले उचलेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
मोदी शी यांना भेटणार?
हिंदुस्थानींच्या घामातून बनलेल्या वस्तूच विकत घ्या, असे आवाहन मोदींनी केले होते. त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच मोदी आता चीनच्या दौऱयावर निघाले आहेत. गेल्या 11 वर्षांतील मोदी यांचा हा सहावा चीन दौरा आहे. या दौऱयात ते शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तिथे त्यांची चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांच्याशी चर्चा होण्याचीही शक्यता आहे.