आमच्याकडून कच्चे तेल विकत घ्या नाहीतर होर्मुझमध्ये स्वतःच लढा, ट्रम्प यांची मित्र राष्ट्रांवर आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धात साथ न दिल्यामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना विशेषतः ब्रिटनला खडे बोल सुनावले आहेत. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत मित्र राष्ट्रांना दोन सल्ले दिले आहेत. एक तर अमेरिकेकडून कच्चे तेल विकत घ्या. अमेरिकेकडे भरपूर तेलसाठा आहे. दुसरे म्हणजे मित्र राष्ट्रांनी धैर्य दाखवावे आणि होर्मुझमध्ये स्वतःच लढावे. अमेरिका आता मदतीला येणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

ब्रिटनने इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला साथ दिली नाही. पण आता त्यांना जेट इंधनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. इराण आणि ओमान दरम्यान असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची वाहतूक होते. सध्या या मार्गावर इराणचे वर्चस्व असल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर याचा परिणाम होत आहे.

सुरक्षेचा प्रश्न असो की तेल पुरवठ्याचा, आता मित्र राष्ट्रांनाच पुढाकार घ्यावा लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ज्या देशांनी अमेरिकेसोबत उभे राहण्यास नकार दिला, त्यांच्यापासून अमेरिका आता स्वतःला दूर ठेवू शकते. इराण लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे आणि युद्धाचा सर्वात कठीण टप्पा संपला आहे. आता इतर देशांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी फ्रान्सबद्दलही नाराजी व्यक्त केली. इस्रायलला जाणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाऊ न दिल्याचा आरोप त्यांनी फ्रान्सवर केला आहे. ट्रम्प यांनी याला चुकीचे वागणे म्हणत अमेरिका हे लक्षात ठेवेल, असे म्हटले आहे.