
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई उपनगरातून वगळलेल्या 15 कोळीवाडय़ांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करून त्या कोळीवाडय़ांचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुंबई उपनगरात 29 कोळीवाडे असल्याचे केंद्रीय फिशरीज इन्स्टिटय़ूटच्या मदतीने तयार केलेल्या अहवालात नमूद आहे, मात्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीने उपनगरात केवळ 14 कोळीवाडे असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे वगळलेल्या उर्वरित 15 कोळीवाडय़ांचा भविष्यात ‘एसआरए’ योजनेत समावेश झाल्यास त्याचा मोठा फटका येथील कोळी बांधवांना बसणार आहे. विकास नियंत्रण नियमावलीत कोळीवाडय़ांसाठी केलेल्या स्वतंत्र तरतुदींमधील लाभांपासून कोळी बांधवांना वंचित राहावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे या कोळीवाडय़ांचा एसआरए योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा आणि त्यांचे पुनर्सर्वेक्षण करावे असे प्रभू यांनी या पत्रात नमूद केले आहे.
शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला असलेले कोळी बांधव हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात 189 गावठाणे आणि 41 कोळीवाडे आहेत. एसआरए योजनेच्या माध्यमातून येणारे संभाव्य संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवांनी तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असेही प्रभू यांनी या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.

























































