
पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ द डिफेन्स फोर्सेज (सीडीएफ) बनलेल्या असीम मुनीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोकळ धमकी द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान हा शांतीप्रिय देश आहे, परंतु कोणी जर इस्लामाबादमध्ये घुसून कारवाई करण्याची भाषा करत असेल तर त्याला जशास तसे प्रत्युतर दिले जाईल, असे असीम मुनीर यांनी हिंदुस्थानचे नाव न घेता टीका केली. पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात जीएचक्यूमध्ये आयोजित कार्यक्रमात मुनीर बोलत होते.
गार्ड ऑफ ऑनर मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना संबोधित करताना मुनीर यांनी म्हटले की, कोणीही कोणत्याही भ्रमात राहू नये. भविष्यात कोणत्याही आक्रमक कारवाईला पाकिस्तान आणखी वेगाने, कठोरपणे आणि तीव्रपणे उत्तर देईन. जगातील युद्ध आता सायबर स्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, अंतराळ, सूचना युद्ध, एआय आणि क्वांटम कम्प्युटिंगपर्यंत पसरले आहे. त्यामुळे स्वतःला नव्या आव्हानासमोर लढावे लागेल. असेही ते म्हणाले.



























































