पाण्याच्या मापात पाप करू नका; पंकजा मुंडे यांचे नगर परीषद प्रशासनाला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरातील नागरिकांना पाणी देतांना नगरपरिषदेकडून भेदभाव होत असल्याने पंकजा मुंडे यांनी जनतेची बाजू घेत आज स्वतः प्रभागात जाऊन पाणी वाटप केले. पाण्याच्या वाटपात होणारा भेदभाव खपवून घेणार नाही, अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना यावेळी दिले. पाऊस नसल्याने शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडेठाक पडल्याने नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय स्तरावरून टॅकर मंजूर केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेने पाणी वाटपात भेदभाव सुरू केल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली. अशा परिस्थितीत स्थानिक रहिवाशांनी काल रात्री पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेवून त्यांनी तहसीलदार विपीन पाटील व मुख्याधिकारी अतुल मुंडे यांना आज सकाळी बोलावून घेत या प्रकाराबद्दल कडक शब्दांत तंबी दिली.

जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेवून त्या आज सकाळीच प्रभाग क्रमांक सहा मधील पद्मावती गल्लीत पोहोचल्या व नगरपरिषदेचे टॅकर बोलावून रहिवाशांना स्वतः पाणी वाटप केले. नागरिकांना पाणी वाटप करतांना कसलेही राजकारण अथवा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही. पालकमंत्री या नात्याने शासन म्हणून आपण स्वतः टॅकर मंजूर केलेले असून हे टॅकर सरकारचे आहेत, त्यात इतरांचा कांहीही संबंध नाही, उगाच कोणीही यात लुडबुड करून फुकटचे श्रेय लाटू नये. सर्व स्तरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.