
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी राजकोट येथे पत्रकार परिषद घेतली आणि गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना एक ‘काम’मंत्रही दिला. भाजप कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षात राहून आम आदमी पक्षासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. भाजपने भाजप कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि मोफत वीज दिली नाही, पण आप त्यांच्या कल्याणाची काळजी घेईल, असेही ते म्हणाले.
भाजपचे अनेक कार्यकर्ते आम आदमी पक्षासोबत येत आहेत. अनेक जण आपसोबत काम करण्यास उत्सुक आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच भाजपमध्ये राहून तुम्हाला काय मिळाले? असा सवाल करत अरविंद केजरीवाल यांनी अशा कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षात राहून आपसाठी काम करण्याचे आवाहन केले. यातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपकडून पेमेंट मिळते. अशा कार्यकर्त्यांना भाजपकडून पेमेंट घ्यावे आणि आपसाठी काम करावे, कारण आपकडे एवढा पैसा नाहीय, असेही ते म्हणाले. तसेच याचा फायदा आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
केजरीवाल यांनी गुजरातमध्येही 24 तास मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना 24 तास मोफत वीज दिली जाईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा, कॉलेज उभारले जातील. तिथे मुलांना मोफत शिक्षण मिळेल. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना मोफत इलाज देण्यासह महिलांना महिन्याला 1000 रुपये भत्ता देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आजपर्यंत तुमचा सामना काँग्रेसशी झालाय, पण आम्ही आम आदमी पार्टीचे लोक आहोत. आम्ही सरदार पटेल आणि भगतसिंह यांना आदर्श मानतो, असे म्हणत केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपला आव्हान दिले. केंद्रीय संस्थांचा वापर केल्याने आम्ही घाबरून जाऊ असे भाजपला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही घाबरणार नाही. आम्ही डरपोक नाही. आम्ही अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहू. गुजरातच्या 6 कोटी लोकांपुढे आता आम आदमी पार्टीचाच पर्याय आहे, ते 27 वर्षांच्या कुशासनाला उत्तर देतील, असेही ते म्हणाले.
‘मणिपूर जदयूमुक्त झालंय, लवकरच बिहारही…’, मोदींची नितीश कुमार यांच्या पक्षाला संपवण्याची भाषा
हल्ले वाढणार
येत्या 2-3 महिन्यात आम आदमी पार्टीशी संबंधीत लोकांवर हल्ले वाढतील. जे लोक आपला मत देतील त्यांच्यावरही हल्ले वाढतील. तसेच भाजपविरोधात बोलणाऱ्यांवर हल्लाबोल केला जाईल, असेही केजरीवाल म्हणाले. परंतु लोकांनी धीर धरावा आणि निवडणुकीत मतांच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करावा असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप नेत्यांवर छापे का नाहीत? ते धुतल्या तांदळासारखे आहेत का? तेजस्वी यादव यांनी तोफ डागली





























































