
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते प्रशासकीय मान्यतेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या शासकीय विभागप्रमुखांच्या बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त शिवशंकर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विविध विभागांना विकासात्मक कामे करण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचे प्रस्ताव तत्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱयांकडे सादर करावेत. सर्व संबंधित यंत्रणांनी मंजूर असलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, यासाठी योग्य ते नियोजन करावे. विभागप्रमुखांच्या कुचराईमुळे नियोजन समितीचा निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. संबंधित विभागाकडून 30 ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव आले नाहीत, तर त्या विभागाचा निधी इतर विभागांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी सूचित केले.
क्रीडा विभागाने प्राथमिक शाळांना क्रीडासाहित्य देण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत. तसेच शाळेच्या मैदानात ओपन जिम निर्माण कराव्यात. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घेऊन मोठय़ा प्रमाणावर प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले. जिल्हा परिषदेचे विविध विभाग, तसेच राज्यस्तरावरील जलसंधारण, बांधकाम, पोलीस विभाग, वन विभाग, क्रीडा विभाग, नगरविकास विभाग या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
बोरामणी विमानतळ निर्वनीकरणाचा प्रस्ताव पुन्हा सादर करणार
बोरामणी येथील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीत काही जमीन वन विभागाची आहे. प्रशासनाने केंद्रीय समितीकडे सादर केलेला वनजमीन निर्वनीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय समितीने फेटाळला आहे. शासनाच्या वतीने या समितीकडे निर्वनीकरणाचा प्रस्ताव नव्याने सादर केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागावा, विमानतळाच्या निर्वनीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रस्तरावर संबंधित मंत्री, खात्याच्या अधिकाऱयांशी बोलून प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लसीकरण मोहिमेला अधिक गती द्या
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविली जात असून, आजपर्यंत 27 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले असले, तरी एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवून लसीकरणाला मोठय़ा प्रमाणात गती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.



























































