
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय बंद करणारे डॉ. बाबा आढाव हे खऱया अर्थाने समाज व्यवस्थेचे डॉक्टर होते.
नागरी संघटनेच्या माध्यमातून भवानी पेठेतून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर वंचितांसाठी काम करून बाबांनी झोपडपट्टीवासीयांचे विविध प्रश्न मार्गी लावले. खेड लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर मात्र सक्रिय राजकारणापासून दूर होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यात जीवन व्यतीत केले.राज्यातील दुष्काळादरम्यान हमालांच्या हलाखीच्या परिस्थितीने व्यथित झालेल्या डॉ. बाबा आढाव यांनी महागाई आणि अन्नधान्याच्या रेशनिंगविरुद्ध सत्याग्रह केला. त्यांनी तीन आठवडे तुरुंगवास भोगला आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. हमालांना संघटित करण्याच्या प्रयत्नांतून हमाल पंचायत ही असंघटित कामगारांची पहिली संघटना त्यांनी स्थापना केली.
डॉ. आढाव यांनी नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वयंरोजगार महिला संघटनेसाठी अरुणा रॉय आणि नर्मदा बचाओ आंदोलन आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी, पुनर्वसन परिषद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत काम केले.
95 व्या वर्षीही ‘जिंदाबाद’चा नारा
कष्टाची भाकर (कष्टाचे अन्न) या उपक्रमालाही पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह (1956 ते 1960) गोवा स्वातंत्र्य संग्रामातही बाबा सामील झाले होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि देवदासी निर्मूलन परिषदेतही त्यांचा सहभाग होता. वयाच्या 95 व्या वर्षी देखील ’जिंदाबाद’चा नारा देत विविध प्रश्नांवर आंदोलन करत राहिले. शरीर थकले, पण बाबांची जिद्द आणि उमेद शेवटपर्यंत कायम होती.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
बाबा आढाव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यभूषण पुरस्कार (2006)
’मॅन ऑफ द इयर’: द वीक मासिकाद्वारे सन्मान (2007).
सामाजिक जीवनगौरव पुरस्कारः टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (2011). या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लाठीचार्जमुळे एक डोळा निकामी
कष्टकऱयांसाठी लढा उभारताना डॉ. बाबा आढाव यांना 53 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. याच दरम्यान 1962 मध्ये त्यांनी सरकारी प्रकल्पा मुळे विस्थापित झालेल्या कुटुंबासाठी त्यांनी लढा दिला. या आंदोलनात त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यात त्यांना एका डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली.
एक गाव एक पाणवठा ही क्रांतीकारी चळवळ
बाबा आढाव यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ’हमाल पंचायती’ची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. यासोबतच, जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ’एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आजही नव्वदी पार करूनही, डॉ. आढाव हे सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठवला..


























































