पौष्टिक च्यवनप्राश

>> डॉ. दीपक केसरकर

च्यवनप्राशच्या जाहिराती आपण नेहमीच पाहतो. बरीच जणं हा च्यवनप्राश खातातही. नैसर्गिक घटकांचे अतिशय उत्तम आणि पौष्टिक आयुवैदीय संस्कारांतून तयार झालेले मिश्रण म्हणजे च्यवनप्राश. आजच्या खूप धावपळीच्या युगात हा च्यवनप्राश घेणं खूप फायदेशीर ठरेल, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव मनात असूनही योग्य नसणारी आहार पद्धतीया सर्वांतून जाणवणारा थकवाहा थकवा च्यवनप्राशच्या सेवनातून बऱ्यापैकी दूर होऊ शकतो.

वार्धक्य अवस्थेतील च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून देणारे औषध अशी ज्यांची आयुर्वेद शास्त्रात ओळख आहे. असे हे च्यवनप्राश. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 500 आवळय़ा ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेल्या अवलोह म्हणजे च्यवनप्राश. हा बनविण्यासाठी 3-4 लोकांची मदत लागते.

च्यवनप्राश तसा पचायला जड आहे. त्यामुळे आम्लपित्त असेल किंवा पचनशक्ती कमी असेल तर हा कल्प खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. च्यवनप्राश खाल्ल्याने भूक प्रचंड वाढते. शिवाय भरपूर अन्न एकाच वेळी खायची रुग्णाची क्षमता वाढते. च्यवनप्राशचा मुख्य घटक आवळा आहे. यामध्ये जीवनसत्त्व सी असते. त्यामुळे तो शरीराची झीज जास्त प्रमाणात होऊ देत नाही. शिवाय त्याच्या नित्य सेवनाने शरीरातील पेशींचे आयुष्य वाढते.

च्यवनप्राशची निवड

च्यवनप्राशची योग्य निवड करण्यासाठी एक वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा च्यवनप्राश घाला. तो लगेचच तळाला जाऊन बसेल. त्यामधील घटक पाण्यात पसरायला नकोत. त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्याचा वास घ्या. त्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरची अशा विविध मसाल्याचा सुगंध येईल. चवीला हा कमी गोड लागेल.

फायदे

 • आयुर्वेदातील उत्तम रसायन औषध म्हणून च्यवनप्राशकडे बघितले जाते.
 • रस धातूपासून शुक्रधातूपर्यंत सर्वांचे पोषण करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे.
 • शरीरातील हाडांची झीज भरून काढण्यासाठी च्यवनप्राश खावा. त्यामुळे खेळाडूसांठी उत्तम आहे.
 • शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी च्यवनप्राश खावा.
 • वृद्ध व्यक्तींनी ताकद टिकून राहावी म्हणून भुकेचा विचार करून योग्य मात्रेत च्यवनप्राश खावा.
 • च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक्षमता, पचनशक्ती वाढते.
 • स्मरणशक्तीत वाढ व्हायला मदत होते.
 • शरीराला एक नवी ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे अकाली येणारे वृद्धत्व टळते. म्हणून मोठय़ा आजारातून उठलेल्या किंवा अशक्त तरुणांनी च्यवनप्राश खावा.
 • सर्दी, खोकल्यासारखे विकार वारंवार होत असतील तर च्यवनप्राश खावा. म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढून हे विकार टाळायला मदत होईल.
 • हल्ली कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून तरुणांमध्ये ह्रदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटकांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन रक्ताभिसरण उत्तमरीत्या सुरू राहते.
 • रक्तशुद्धीकरण होऊन शरीर नैसिर्गिकरीत्या संतुलित राहायला मदत होते.
 • मासिक पाळीशी संबंधित तक्रारी असतील तर च्यवनप्राश खावा.

च्यवनप्राश कसा सेवन करावा

ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांनी सकाळी एक चमचा च्यवनप्राश अनशापोटी घ्यावा. त्यानंतर अर्धा तास काही खाऊ नये. मध किंवा दुधासोबत घेऊ नये. कारण च्यवनप्राश एकत्र घेतल्याने विरुद्ध अन्न सेवन होऊन विष निर्माण होऊ शकते, जे शरीरास हानिकारक असते.

बनविण्याची पद्धत

साहित्य : आवळे, क्याथ द्रव्य, तेल, तूप, मध प्रक्षेप द्रव्य, साखर.

कृती : सर्वप्रथम आवळे धुऊन एका कपडय़ात  पुरचुंडी बांधावी. ही पुरचुंडी पातेल्यात काठीच्या सहाय्याने लोंबकळत ठेवावी. पातेल्यात ती पुरचुंडी बुडेल एवढे पाणी घ्यावे. त्या पाण्यात काढय़ाची द्रव्य मिक्स करून गॅसवर ठेवावे. काढय़ामध्ये आवळा मऊ होईपर्यंत शिजवणे. आवश्यकता असेल तेव्हा पातेल्यात पाणी वाढवत जाणे. आवळा शिजवल्यावर गॅस बंद करा. आवळे पुरचुंडीतून बाजूला काढणे आणि सुती कापड पातेल्यावर बांधून त्यावर शिजवलेला आवळा दाब देऊन फेटावे आणि मावा पाडावा. खाली पातेल्यात जमा झालेला मावा थोडय़ा वेळासाठी कापडात बांधून लोंबकळत ठेवणे. त्यातून जे पाणी खाली पडेल ते एका भांडय़ात घ्यावे. त्यानंतर मावा तेल किंवा तुपात पलित्याने हलवावा. सुरुवातीला मावा पातेल्यात सर्व तेल शोषून घेईल आणि शिजल्यावर त्यातून तेल बाहेर पडेल. नंतर गॅस बंद करावा. साखरेचा पाक करण्यासाठी पातेल्यात साखर घेऊन त्यात गाळलेले पाणी, साखर भिजेल तेवढा काढा त्यात मिक्स करून एक तारी पाक करावा. पाक झाल्यानंतर त्यात परलेला मावा मिक्स करून गाठी होऊ देता व्यवस्थित पसरवणे. रात्रभर भांडे कापडाने झाकून ठेवणे. सकाळी त्यात मध, प्रक्षेप टाकून एकत्र करून 7 दिवस मुरण्यास ठेवणे. अशाप्रकारे अमृत समान च्यवनप्राश तयार होतो.

लेखक आयुर्वेदतज्ज्ञ आहेत.