
मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून तिचा व्याप आपणच वाढविला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे भाषिक प्रयोग करून मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी केले.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आणि साठये महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘संवाद नारळीकरांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठीतील विज्ञान कथा लेखक आणि खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी भाषेचा व्यवहारातील आणि विविध ज्ञानक्षेत्रातील वापर, मराठीतील विज्ञान साहित्य आणि साहित्य संमेलन या विषयांवर डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी आपले मत मांडले.
तसेच विज्ञान कथा कशी सुचली, त्या मागील प्रेरणा कोणती होती, लयाबाबतही आपल्या शैलीत नारळीकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास पार्ले टिळक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू, सचिव दिलीप पेठे, संचालक मंडळाच्या सदस्या डॉ. स्नेहलता देशमुख, संस्थेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आभासी माध्यमातून उपस्थित होते.
तसेच सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी शब्दोत्सव या आभासी कार्यक्रमातून पाटिविअच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना काव्यरसपूर्ण मार्गदर्शन केले तर प्रथितयश लेखिका डॉ. विजया वाड यांनी गोड गोष्टीतून शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. वरील सर्व कार्यक्रमांसाठी संस्थेचे शिक्षक आणि विजेते विद्यार्थी संस्थेच्या मराठी भाषाविश्व दालनात उपस्थित होते तर उर्वरित विद्यार्थ्यांनी आभासी माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
























































