लोकविधा- संतसाहित्य आणि लोकसाहित्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मुकुंद कुळे

संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांच्यातील साम्य-भेद शोधण्याचा-अभ्यासण्याचा प्रयत्न अनेकदा केला जात असतो. कारण संतसाहित्य आणि लोकसाहित्य या वाङ्मयीन संज्ञा वेगवेगळ्या असल्या तरी लोकसाहित्यात मानवी जगण्याचा एकजिनसी सारांश जसा आढळून येतो, तसाच तो संतसाहित्यातही आढळतो. किंबहुना, संतांनी लोकपरंपरेचा आधार घेत पांडुरंगाप्रतिची आपली भावाभिव्यक्ती प्रकट केली असल्यामुळे अनेकदा संतसहित्य हे लोकसाहित्याचंच एक रूप असल्याचा भास होतो.

साधारणपणे इसवी सनाच्या बाराव्या शतकात वारकरी संप्रदायाचा उगम झालेला दिसतो आणि तिथून संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली संतपरंपरा अगदी अठराव्या शतकातील निळोबारायांपर्यंत सुखेनैव सुरू असलेली दिसते. अर्थात वारकरी संप्रदाय आणि त्यातील भावभक्तीच्या धारा आता एकविसाव्या युगातही वाहत आहेत, परंतु आपण ज्याला रूढार्थाने संतसाहित्य म्हणतो, त्या साहित्याची रचना किंवा निर्मिती प्रामुख्याने अठराव्या शतकापर्यंत सुरू असलेली दिसते. या मध्ययुगीन कालखंडात केवळ वारकरी संप्रदायच निर्माण झाला असं नाही, त्याव्यतिरिक्तही इतर अनेक संप्रदाय, पंथांचा उगमही या कालखंडात झाला. उदाहरणार्थ महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय. या सर्वच संप्रदायांचं-पंथांचं काम स्वतंत्रपणे महत्त्वाचं आहे. मात्र जेव्हा आपण संतसाहित्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने वारकरी संप्रदायातील संतांचं साहित्यच असतं. कारण वारकरी संप्रदाय खऱया अर्थाने समाजाधिष्ठित आणि समाजसन्मुख असा संप्रदाय होता. परिणामी या संप्रदायातील संतांनी निर्माण केलेल्या साहित्याच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रातला तत्कालीन समाजच होता आणि जरी संतांच्या साहित्यनिर्मितीचं प्रेरणास्थान त्यांचं उपास्य दैवत असलेला विठोबा असला तरी त्या साहित्यातून संतांची सकल जगदोद्धाराची मनीषा व्यक्त झालेली दिसते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत तुकाराम, संत बहिणाबाई… नावं तरी कुणाकुणाची घ्यावीत! वारकरी संप्रदायाने अगदी बारा बलुतेदारांचा मेळ साधला आणि संपूर्ण समाज एक केला. या साऱयाच संतांनी आणि त्यांच्या ओवी-अभंगरूपी संतसाहित्याने समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. समाजाचं नैतिक अधिष्ठान उंचावण्याचा प्रयत्न केला. समाजातील जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मातीतला माणूस एकजीव-एकरूप करण्याचा प्रयत्न संत आणि त्यांच्या संतसाहित्याने केला आणि मध्ययुगीन कालखंडातील संतांच्या साहित्यामुळे हा जो मराठी समाज एक झाला किंवा एकत्र आला, त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्नं पूर्ण झालं. कारण या संतसाहित्याने एक प्रकारे स्वराज्य निर्मितीसाठी आवश्यक असलेली मनोभूमी-भावभूमी तयार करून ठेवली होती. स्वराज्यासाठी, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येण्यासाठी ज्या सांस्कृतिक संचिताच्या निर्मितीची गरज होती, ते संचित संतांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलं होतं, जमा केलं होतं. इथे ‘सांस्कृतिक संचित’ हाच शब्द योग्य आहे. कारण शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया हे सांस्कृतिक संचितच होतं, धार्मिक नव्हतं. तेव्हा मध्ययुगीन कालखंडात संतांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे संतसाहित्य आणि हे साहित्य जरी लौकिक पातळीवरचं असलं तरी ते अलौकिकाचा मार्ग दाखवणारं होतं. परंपरेचा हात घट्ट धरून ते व्यापक मार्गावर नेणारं होतं.

तर लोकसाहित्य किंवा लोकतत्त्व म्हणजे एकप्रकारे परंपरेने चालत आलेल्या समाजधारणा. तेव्हा ‘लोकसाहित्य’ या शब्दातील ‘लोक’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा शब्द समाज निदर्शक आहे, समूह निदर्शक आहे. ‘लोकसाहित्य’ या शब्दांत अभिप्रेत असलेले ‘लोक’ म्हणजे कोण, तर तो सरसकट समाज किंवा समूह म्हणता येईल का? तर कदाचित नाही. वैशिष्टय़पूर्ण जीवनशैली असलेला अगदी आताच्या काळातला समाजही ‘लोक’ असू शकतो. मात्र प्रत्येक काळातला प्रत्येक समूह हा ‘लोक’ या संज्ञेखाली किंवा संकल्पनेखाली एक असू शकत नाही. त्यामुळेच अगदी वैदिक काळापासून ‘लोक’ हा शब्द वेगळेपणाने अधोरेखित केला गेला आहे. तर मग हा ‘लोक’ म्हणजे कुठला समाज किंवा कुठला समूह? तर संख्येने अतिशय कमी असलेल्या अभिजनांपेक्षा खूपच मोठा असलेला बहुजन समाज. तर हा जो बहुजन समाज आहे, तो पूर्वापार वेदकाळापासून एकप्रकारे ‘लोक’ आहे आणि त्याची समग्र जीवनशैली ही कायमच अभिजनांपेक्षा वेगळी राहिलेली आहे. वेगळी म्हणजे काय, तर अभिजन वर्ग हा कायमच सज्ञान, सुस्थितीत राहिल्यामुळे त्याची जीवनशैली ही सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक आणि नैतिकदृष्टय़ाही कायमच उंचावलेली राहिलेली आहे. तर आकाराने-संख्येने मोठा असलेला बहुजन समाज हा कायमच सर्वच प्रकारच्या सोयीसुविधांपासून दूर राहिल्यामुळे त्याची जीवनशैली ही कायमच उपेक्षित, निम्न स्तरातील राहिली. तरी ही जीवनशैली कायमच बहुपेडी आणि बहुविधा होती. मुख्य म्हणजे ही जीवनशैली निसर्गसंवादी होती. त्यामुळेच ‘लोक’ या संज्ञेने अधोरेखित केल्या जाणाऱया समूहाची-समाजाची संस्कृती ही निसर्गतत्त्वांनी बांधलेली होती. निसर्गातील ताल आणि लय त्यांच्यात भिनलेली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जगण्याचा व्यास हा व्यक्तीपेक्षा समष्टीकडे कललेला होता आणि त्यांच्या परंपरा या कोणत्याही प्रकारच्या शिक्षित परंपरेतून आलेल्या नव्हत्या, तर त्या पिढय़ान्पिढय़ांच्या अवलोकनातून-अनुभवातून आणि निरीक्षणांतून चालत आलेल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांची वैशिष्टय़पूर्ण जीवनशैली आकाराला आलेली होती. बुद्धीपेक्षा भावनेला त्यांच्या जीवनात असलेल्या महत्त्वामुळे या समूहाच्या किंवा समाजाच्या जगण्यात-वागण्यात व्यक्तिकेंद्रिततेऐवजी समूहाला महत्त्व होतं आणि साहजिक त्यातूनच जरी जगण्यातली कुठलीही निर्मिती किंवा कुठलीही कृती ही जरी एका व्यक्तीची असली तरी त्यामागची प्रेरणा संपूर्ण समूहाची असल्याचं मानलं जातं. जरी एकाच व्यक्तीचं मन-भावना असल्या तरी त्या ‘लोक’ म्हणजे समूहाच्या भावना मानल्या जातात. तेव्हा लोकसाहित्य-लोकतत्त्व म्हणजे पिढय़ान्पिढय़ा परंपरेने चालत आलेलं, आत्मसात केलेलं आणि सांभाळलेलं समूहभान. हे समूहभान म्हणजे एकप्रकारे लोकभान असतं.

संतसाहित्य आणि लोकसाहित्य म्हणजे नेमकं काय याचा थोडक्यात मागोवा घेतल्यावर या दोहोंच्यात काही संबंध आहे का, याकडे वळू या. तर सर्वप्रथम आपल्याला हे ठामपणे सांगावं लागेल की, संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांच्यात अभिन्न असं एकतत्त्व आहे. एकरूपत्व आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी अगदी वैयक्तिक स्वरूपात आपल्या साहित्याची निर्मिती केलेली असली किंवा त्यांच्या त्यांच्या अभंग-ओव्यांवर त्यांची त्यांची नाममुद्रा उमटलेली असली तरी या संतसाहित्यामागे एकप्रकारे समूहमनच कार्यरत होतं. म्हणजेच लोकमानसच त्यामागे होतं. कारण प्रत्येकच संत हा त्या-त्या काळातील समाजाचा प्रतिनिधी होता. नावाला तो वेगवेगळ्या जातीतला होता खरा, पण कोणत्याही संताने स्वतला विशिष्ट एका जातीत बंदिस्त करून घेतलं नाही. संपूर्ण समाजाला वगळून त्याने आपल्या अस्तित्वाची कल्पना कधीच केली नाही आणि हा समाज एकप्रकारे तत्कालीन बहुजन समाज होता. पिढय़ान्पिढय़ांचं सांस्कृतिक संचित जपत आलेला. त्यामुळेच संतांच्या साहित्यात आपल्याला पूर्वापारचं लोकसंचित दडलेलं दिसतं आणि हे लोकसंचित अगदी उघडंवाघडं असतं. कायमच ते काही सुघड, सुघटित असं नसतं. उलट सामान्यांच्या जगण्या-बोलण्यातलं अकृत्रिमपणच त्यात असतं. उदाहरणार्थ, एरवीच्या आपल्या वैदिक देवदेवतांना आपण काही शिव्या वगैरे देणार नाही किंवा त्यांची निंदानालस्ती करणार नाही आणि तशी करण्याचा प्रयत्न कुणी केला तर आपले संस्कृती रक्षक हजरच असतात, आमचा लोकदेव विठोबा घ्या. संतांनी त्याच्याशी जिवाभावाचं नातं तर जोडलंच, पण प्रसंगी त्याला शिव्याही घातल्या. त्याशिवाय का आमची जनी म्हणाली –

अरे विठय़ा विठय़ा ।
मूळ मायेच्या कारटय़ा ।।1।।
तुझी रांड रंडकी झाली ।
जन्मसावित्री चुडा ल्याली ।।2।।
तुझे गेले मढे ।
तुला पाहून काळ रडे ।।3।।
उभी राहूनी अंगणी ।
शिव्या देत दासी जनी ।।4।।

पराकोटीचं प्रेम-भक्ती असल्याशिवाय देवाला शिव्या द्यायची ताकद माणसात येत नाही. लोकतत्त्वात लोकदेव आणि भक्त-समाज वेगळा असत नाही. त्यांचं जगणं-रडणं समानच असतं. जनाबाई जेव्हा म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी… तेव्हा ती फार मोठी ाढांती असते. कधीच सोपं नसतं, डोईवरचा पदर खांद्यावर घेणं. त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते, पण जनाबाई विठुरायासाठी हे धाडसही करायला तयार होतात. कारण विठोबा त्यांच्यासाठी आई-बाप-बहीण-भाऊ आणि प्रियकर… सारं काही असतो. दैवताशी थेट एवढी नाती, तीही लौकिक पातळीवर जोडण्याची मुभा फक्त लोकपरंपरेतील लोकदैवतातच असते.
संतसाहित्यात हे लोकतत्त्व आरपार भिनलेलं आहे. ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्या घ्या, विराण्या घ्या, त्यातून परंपरेने चालत आलेलं लोकतत्त्वीय शहाणपणच आपल्याला अनुभवायला मिळतं.

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ।।1।।
उड उड रे काऊ
तुझे सोन्याने मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ।।2।।

या विरहिणी किंवा विराणीमध्ये आपल्याला पारंपरिक लोकसंकेत आढळून येतो. हा लोकसंकेत म्हणजे काय, तर कावळा ओरडायला लागला की समजून जावं, आज आपल्या घरी कुणीतरी पाहुणे येणार आहेत.
संत नामदेवांनी लिहिलेल्या बाळकृष्णावरील अभंगांत कितीतरी लोकतत्त्वीय रूपं पहायला मिळतात आणि नाथांचं तर व्यक्तिमत्त्वच लोकतत्त्वाने परिपूर्ण होतं. त्यांचा जन्म म्हणायला ब्राह्मण समाजातला, परंतु त्यांनी जशी लोकजीवनशैली-लोकव्यवहार आपलासा केला तसा क्वचितच कुणी केला असेल. त्यांचं लोकतत्त्वीय निरीक्षण एवढं सूक्ष्म होतं की, त्यांच्या भारुडांत लोकपरंपरेतील सगळे उपासक येतात, सगळ्या रीतीभाती येतात. नाथांनी एकप्रकारे आपल्या भारुडांतून लोकपरंपरेतील देव्हाराच उजळून टाकला आहे. तो उजळून काढताना त्यांनी लोकपरंपरेतून लोकप्रबोधनाचा मार्ग सुकर केला आहे. तेव्हा लोकसाहित्य म्हणजे लोकसमूहांच्या एकूणच जगण्याचा हुंकार असतो आणि हा हुंकार संपूर्ण संतसाहित्यातही तीव्रतेनं ऐकायला येतो.
[email protected]