डॉ. ओ. पी. कपूर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे. जे. रुग्णालयातील निवृत्त डॉक्टर व अत्यंत प्रतिष्ठsचा बी. सी. रॉय पुरस्कार विजेते डॉ. ओम प्रकाश कपूर (88) यांचे गुरुवारी रात्री मुंबई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. कपूर हे ‘ओपी’ नावाने परिचित होते. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य लेक्चर्स देण्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आतापर्यंत त्यांच्या या लेक्चर्सचा एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. जगातल्या 112 शहरांमध्ये जनरल प्रॅक्टिशनरसाठी रिफ्रेशर कोर्स आयोजित केले होते.

डॉ. कपूर यांनी भायखळा येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. 1955 मध्ये एमबीबीएस झाले. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी जे. जे. रुग्णालयातील मोतलीबाई थिएटरमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रात्रीची लेक्चर घेण्यास सुरुवात केली.

जे.जे. मधून 1985 मध्ये वयाच्या 55 व्या वर्षी ते निवृत्त झाले. त्यानंतर लगेच त्यांनी सायन, केईएम, नायर आणि जे. जे. रुग्णालयांतील पदवी आणि पदव्युत्तर डॉक्टरांसाठी विनामोबदला लेक्चर घेण्यास सुरुवात केली. पुढे विद्यार्थ्यांसाठी हॉल कमी पडू लागल्याने बॉम्बे हॉस्पिटलने बिर्ला मातोश्री सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. आजवर बिर्ला मातोश्री सभागृहात त्यांची 300 हून अधिक लेक्चर्स झाली असून 40 हजारांहून अधिक डॉक्टरांनी त्याचा लाभ घेतला.

वैद्यक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठsचा समजला जाणारा बी. सी. रॉय, बेस्ट टीचर ऑफ मिलेनियम, धन्वंतरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. शेवटच्या श्वासापर्यंत तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचा निश्चय त्यांनी कायम ठेवला होता.