
>> डॉ. प्रदीप आवटे
कोविड विषाणू आता आपल्या वातावरणात स्थिरावला आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे हा विषाणू एंडेमिक झाला आहे. त्यामुळे हवामानानुसार त्यामध्ये वाढ आणि घट होऊ शकते. सध्या देशासह राज्यात शीत लहर सुरू आहे. या सिझनल बदलामुळे इन्फ्ल्युएंझा कोविड आजारामध्ये वाढ होते आहे. त्यामुळे आता कोविड रुग्णांमध्ये काही प्रमाणात जी वाढ होताना दिसते आहे ती केवळ जे एन-7 मुळे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. या वाढीमध्ये हवामानविषयक घटकांचा वाटा मोठा आहे.
मार्च 2020 पासून आपण कोविड 19 चा सामना करत आहोत. कोरोना विषाणूचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे हा विषाणू त्याच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल करतो आहे. मागील दोन वर्षांच्या काळामध्ये अल्फा, बीटा, डेल्टा आणि आता नव्याने आलेला ओमायक्रॉन असे अनेक विषाणूमधील बदल आपण पाहिलेले आहेत. विषाणू जेव्हा बदलतो तेव्हा तो नुसता बदलत नाही. त्या जनुकीय बदलासोबत त्याला काही नवे गुणधर्मदेखील प्राप्त होतात हेही आपण पाहतो आहोत.
विषाणू बदल का आणि कशासाठी?
विषाणू बदलतात म्हणजे काय आणि विषाणू का बदलतो? हे दोन प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहेत. विषाणू हा मुळात सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारा सूक्ष्मजीव आहे. एखाद्या जिवंत पेशीत प्रवेश केल्याशिवाय विषाणू तगून राहू शकत नाही किंवा वाढू शकत नाही. विषाणू एखाद्या सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वतच्याच अनेक कॉपी तयार करतो. एका अर्थाने एखाद्या झेरॉक्स मशीनवर आपण मूळ कागदपत्राच्या अनेक प्रती कराव्यात, अशा पद्धतीने एका विषाणू कणाचे अनेक विषाणू कण पेशीमध्ये तयार होतात. मात्र या कॉपी तयार करताना आपल्याकडून जसे टायपो होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात त्या पद्धतीने विषाणूंच्या कॉपी करतानाही घडते आणि त्यातून विषाणूच्या रचनेमध्ये बदल होऊन विषाणू म्युटेट होतो.
विषाणूमध्ये होणारे हे बदल अनेकदा नजरचुकीने होणारे बदल असतात, तर काही वेळा यजमानाच्या प्रतिकारशक्तीला फसविण्यासाठी, तिच्यावर मात करण्यासाठी विषाणूविरोधी औषधांचा मारा चुकवण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक बदलही असतात. कोणत्याही सजीवाच्या उक्रांतीमधील नैसर्गिक निवड हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे विषाणूमध्ये हे जे बदल सातत्याने होत असतात त्यातील जो बदल विषाणूला तगून राहण्यासाठी मदत करतो ते बदल अधिक काळ टिकतात. ज्या शरीरामध्ये विषाणूने प्रवेश केला आहे त्याला मारण्यामध्ये विषाणूचेही नुकसान असते. कारण मग त्याला नवीन जिवंत पेशी शोधावी लागते. म्हणूनच अत्यंत घातक स्वरूपाचे बर्ड फ्लूसारखे विषाणू अधिक वेगाने पसरताना दिसत नाहीत, तर वेगाने पसरणारे फ्लूसारखे विषाणू तेवढे प्राणघातक नसतात.
विषाणू बदलाचा परिणाम
विषाणू आपली जनुकीय रचना बदलतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला काही वेळा नवे गुणधर्म प्राप्त होऊ शकतात. काही वेळा हे बदल विषाणू प्रसारास सहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा प्रसाराचा वेग मंदावतोदेखील. काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर हल्ला करेल याचे स्वरूपदेखील बदलू शकते. तसेच विषाणूच्या घातकतेमध्येदेखील एकूण काय विषाणू हे कोणत्याही कसलेल्या अभिनेत्यापेक्षा कमी नसतात. ‘नया दिन नही रात’ चित्रपटामध्ये नऊ भूमिका केलेल्या संजीव कुमारसारखे विषाणू नवनवे रूप घेऊन आपल्यासमोर सातत्याने येत असतात. पण तरीही मूळ अभिनेता कोण, हे आपण ओळखतोच. तेवढे हुशार आपणही आहोतच.
कोविडची पुन्हा चर्चा
कोविडची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दर महिन्या-दोन महिन्यांनी कोविडचे नवे बाळ आपल्याला भेटायला येते आहे. आता जेएन-1 हे कोविडचे नवे बाळ आपल्या अंगणात आले आहे. मूळात हे नवे बाळ ओमायक्रॉन कुटुंबातीलच आहे. आपण नियमितपणे कोविड विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करतो आहोत आणि त्यामुळे विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आपल्याला लगोलग कळत आहेत. जेएन-1 हा नवा विषाणू प्रकार मुळात फार काळजी करावा असा नाही. सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि हिंदुस्थानात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना याला व्हेरियंट ऑफ कंसर्न म्हणजे काळजी करावा असा व्हेरियंट म्हणत नाही. कारण या नव्या विषाणू प्रकारामुळे आजार प्रसाराचा वेग जरी वाढत असला तरी त्याचा संसर्ग घातक नाही. एकूणात सौम्य स्वरूपाचा संसर्ग होताना दिसतो आहे.
मूळात आपल्याकडे कोविड विषाणू आता आपल्या वातावरणात स्थिरावला आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे हा विषाणू एंडेमिक झाला आहे. त्यामुळे हवामानानुसार त्यामध्ये वाढ आणि घट होऊ शकते. सध्या देशासह राज्यात शीत लहर सुरू आहे. या सिझनल बदलामुळे इन्फ्ल्युएंझा कोविड आजारामध्ये वाढ होते आहे. त्यामुळे आता कोविड रुग्णांमध्ये काही प्रमाणात जी वाढ होताना दिसते आहे ती केवळ जे एन-7 मुळे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. या वाढीमध्ये हवामान विषयक घटकांचा वाटा मोठा आहे. येणाऱ्या काळातही इन्फ्ल्युएंझाप्रमाणे कोविडदेखील पावसाळा आणि हिवाळ्यात काही प्रमाणात वाढू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
स्वतच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल करत राहणे हा विषाणूच्या जीवनक्रमातील नैसर्गिक भाग आहे. विषाणूला स्वतची संख्या वाढविण्यासाठी एका सजीव पेशीची गरज असते. या सजीव पेशीतील संसाधनाच्या मदतीने विषाणू स्वतची संख्या वाढवत असतो. विषाणूची संख्यात्मक वाढ होत असताना त्यामध्ये काही चुका जाणता-अजाणता होतात, त्यालाच आपण म्युटेशन असे म्हणतो.
विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये होणारे बदल अधिक महत्त्वाचे असतात. कारण स्पाइक प्रोटिनच्या मदतीने विषाणू मानवी शरीरातील रिसेप्टरसोबत जोडला जातो, फुप्फुसातील पेशींना चिकटतो. त्यामुळे या प्रथिनातील बदल अधिक महत्त्वाचे असतात. पण सुदैवाने जेएन-1 या व्हेरियंटमुळे प्रसाराचा वेग वाढण्याशिवाय काही वावगे घडताना दिसत नाही. त्यामुळे पॅनिकची गरज नाही. भीती अजिबात नको आहे.
पण भीती नको असे म्हणताना नुकताच साजरा झालेला ख्रिसमस आणि नव वर्षाचा काळ लक्षात घेता काळजी घेणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. विशेषत ज्यांना डायबिटिस, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा असे अतिजोखमीचे आजार आहेत आणि ज्यांचे वय साठीच्या पुढे आहे त्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. ज्यांना फ्ल्यूसारखी लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांत जाणे टाळायला हवे. आपल्या घरात सीनियर सीटिझन, मधुमेह, उच्च रक्तदाब असणारे कोणी असेल तर त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी आणि विनाकारण एकमेकांना घाबरवणारे खोटे मेसेज फॉरवर्ड करणेही टाळले पाहिजे. प्रत्यक्ष रोगापेक्षा सोशल मीडियामधून पसरणारे इन्फोडेमिक अनेकदा पँडेमिक किंवा इपिडेमिकपेक्षा भयावह असते आणि कोणताही विषाणू नव्हे तर आपणच ते पसरवत असतो. सोशल मीडिया जबाबदारीने वापरणे म्हणूनच अगदी आवश्यक गोष्ट.
कोविड काय कोणताही विषाणू हा बहुरूपीच असतो. त्याची रूपे योग्यवेळी ओळखून आवश्यक ती खबरदारी घेत आपणही त्याच्यासोबत जागरूक नागरिक म्हणून आपल्यात आवश्यक ते बदल करू या.
(लेखक महाराष्ट्र आरोग्य सेवेत वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहेत.)



























































