कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  डॉ. प्रकाश आमटेंचा लोकबिरादरी प्रकल्प पर्यटकांसाठी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढत आहे. सुरक्षेबाबत शासनाने आदेश दिले असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेशापर्यंत लोकबिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. लोकबिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

गेली 46 वर्ष हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी विकासाचे-आरोग्याचे काम करीत आहे. सर्वोपचार मोफत दवाखाना, 650 विद्यार्थ्यांसाठी 1 ली ते 12 वी पर्यंतची आश्रमशाळा, वन्यजीव अनाथालय व पर्यावरण संवर्धन, गाव विकास, तलाव निर्मिती व खोलीकरण, नेलगुंड्यासारख्या दुर्गम भागात शाळा अशा विविध स्तरावर अविरत कार्य करीत आहे. शासनाच्या आदेशानुसार आश्रमशाळेला सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि दवाखान्यातील आदिवासी रुग्णांना येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना व्हायरसची बाधा होऊन प्रसार होऊ नये म्हणून प्रकल्प बंद ठेवण्यात येत आहे.