मानवी तस्करीचे जागतिक आव्हान

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या अहवालानुसार जगभरातील अंदाजे 40.3 दशलक्ष आधुनिक गुलामगिरीत अडकून बळी पडले आहेत. 27 दशलक्ष प्रौढ आणि 13 दशलक्ष मुले मानवी तस्करीचे बळी आहेत. 24.9 दशलक्ष सक्तीच्या मजुरीसाठी शोषित आहेत आणि 15.4 दशलक्ष सक्तीच्या विवाहामुळे शोषित आहेत. जगात प्रति एक हजार लोकांमागे 5.4 आधुनिक गुलामगिरीचे बळी आहेत. 2018 च्या जागतिक गुलामगिरी निर्देशांकानुसार, 167 देशांपैकी हिंदुस्थान 53 व्या क्रमांकावर आहे. सध्या 1.4 टक्के लोक गुलामगिरीत आहेत.

आज देशात समस्यांचा महापूर मोठय़ा प्रमाणावर आहे. झपाटय़ाने वाढणारी महागाई, बेकारी, आर्थिक विषमता, गरिबी, भूक, कुपोषण, रोगराई, प्रदूषण, भेसळ, संस्कृतीहीन वागणूक, डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण, देशावरील वाढते कर्जाचे डोंगर, गुन्हेगारीचा वाढता ग्राफ, भ्रष्टाचार, नैसर्गिक साधन संपत्तीचे अतिवापर अशा अनेक समस्या समाजाला पोकळी निर्माण करत आहेत. अशा समस्या नवीन समस्यांना जन्म देतात, त्यापैकी ‘मानवी तस्करी’ ही मुख्य समस्या आहे. मानवी तस्करी जगभर मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. मानवी तस्करी करून प्राण्यांपेक्षाही भयंकर नरकयातना देऊन निष्पाप जिवांना गुलाम बनवून अमानुष वागणूक दिली जाते. पुरुष, महिला आणि सर्व वयोगटातील कोणत्याही पार्श्वभूमीतील मुले या गुह्याला बळी पडू शकतात.

या वर्षी 2022 ची जागतिक मानवी तस्करीविरोधी दिनाची थीम ‘तंत्रज्ञानाचा वापर आणि गैरवापर’ आहे, जे मानवी तस्करी सक्षम आणि अडथळा आणणारे साधन म्हणून तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. 2018 च्या जागतिक गुलामगिरी निर्देशांकानुसार, 167 देशांपैकी हिंदुस्थान 53 व्या क्रमांकावर आहे. सध्या 1.4 टक्के लोक गुलामगिरीत आहेत. हिंदुस्थानातील सुमारे 18.3 दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीत जगत होते. पैलाश सत्यार्थी फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे की, 21 टक्के कुटुंबे त्यांच्या वाढत्या आर्थिक संकटामुळे मुलांना बालमजुरीमध्ये पाठवण्यास इच्छुक आहेत. जागतिक स्तरावर, 2020 मध्ये ‘सेव्ह द चिल्ड्रन’चा अंदाज होता की, गरिबीमुळे आणखी पाच लाख अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने लग्नासाठी भाग पाडले जाईल. कोरोनाकाळात जून आणि जुलैमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तेव्हा मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्के बालविवाहांमध्ये वाढ झाली. टाळेबंदीच्या काळात 11 दिवसांत सरकारी हेल्पलाइनवर 92 हजार बाल अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद झाली. हिंदुस्थानातील विधी सेवांनुसार, दर तासाला चार मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते, त्यापैकी तीन त्यांच्या इच्छेविरुद्ध असतात. 2019 मध्ये, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात 1 लाख 19 हजार 617 मुले हरवल्याची नोंद झाली आहे. दर महिन्याला 64 हजार 851 मुले, महिला आणि पुरुष बेपत्ता होतात. हिंदुस्थानात अंदाजे तीन लाख बाल भिकारी आहेत. एप्रिल 2020 ते जून 2021 दरम्यान, 9 हजारांहून अधिक मुलांची तस्करांपासून सुटका करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या अहवालानुसार जगभरातील अंदाजे 40.3 दशलक्ष आधुनिक गुलामगिरीत अडकून बळी पडले आहेत. 27 दशलक्ष प्रौढ आणि 13 दशलक्ष मुले मानवी तस्करीचे बळी आहेत. 24.9 दशलक्ष सक्तीच्या मजुरीसाठी शोषित आहेत आणि 15.4 दशलक्ष सक्तीच्या विवाहामुळे शोषित आहेत. जगात प्रति एक हजार लोकांमागे 5.4 आधुनिक गुलामगिरीचे बळी आहेत. जगभरात तस्करीच्या बळींपैकी 71 टक्के महिला व मुली आणि 29 टक्के पुरुष व मुले आहेत. आधुनिक गुलामगिरीचा बळी चार मुलांपैकी एक आहे. घरगुती काम, बांधकाम किंवा शेती यासारख्या खासगी क्षेत्रात 16 दशलक्ष लोकांचे शोषण केले जाते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उघड केले आहे की, दरवर्षी सुमारे 40 हजार मुलांचे अपहरण केले जाते, त्यापैकी 11 हजार सापडत नाहीत आणि हिंदुस्थानात फक्त 10 टक्के मानवी तस्करी आंतरराष्ट्रीय आहे, तर 90 टक्के आंतरराज्यीय आहेत. सक्तीचे आणि बंधनकारक मजुरांचे कोणतेही विश्वसनीय अभ्यास पूर्ण झालेले नसले तरी एनजीओचा अंदाज आहे की, ही समस्या 20 ते 65 दशलक्ष हिंदुस्थानींना प्रभावित करते.
हिंदुस्थानातील मानवी तस्करी प्रतिबंध कायदे

कलम 23 मानवी तस्करी आणि बेगार (पैसे न देता सक्तीचे श्रम) प्रतिबंधित करते.
कलम 24 हे 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखाने आणि खाणींसारख्या धोकादायक कामात काम करण्यास मनाई करते.
हिंदुस्थान दंड संहिता (आईपीसी) कलम 370 आणि 370अ मानवी तस्करीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करते, ज्यामध्ये शारीरिक शोषण किंवा कोणत्याही स्वरूपातील शोषण, लैंगिक शोषण, गुलामगिरी किंवा मानवी अवयव बळजबरीने काढून टाकणे यासह बाल तस्करीचा समावेश आहे.
कलम 372 आणि 373 वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने मुलींची विक्री आणि खरेदी यांच्याशी प्रतिबंध संबंधित आहे.
अनैतिक धंदे (प्रतिबंध) कायदा, 1956 (आईटीपीए) हा व्यावसायिक लैंगिक शोषणाचा तस्करी रोखण्यासाठी प्रमुख कायदा आहे. 
स्त्रिया आणि मुलांच्या तस्करीशी संबंधित इतर विशिष्ट कायदे लागू केले गेले आहेत जसे की, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, बंधपत्रित कामगार प्रणाली (निर्मूलन) कायदा 1976, बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा 1986, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994.
लैंगिक गुह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा 2012, लैंगिक शोषण आणि शोषणापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी एक विशेष कायदा आहे.
थोडी काळजी आणि जागरुकता ठेवली तर आपण अशा समस्यांपासून दूर राहू शकतो
इंटरनेट हे मानवी तस्करीच्या जाळय़ात अडकवण्याचा उत्तम मार्ग आहे. इंटरनेटचा जपून वापर करा. आधुनिकतेच्या आंधळय़ा मार्गावर धावण्यापूर्वी मर्यादा आणि खबरदारी समजून घेणे आवश्यक आहे.
मुलांना इंटरनेट वापरण्याचा खरा अर्थ शिकवा.
मुलांना संस्कार, चांगले-वाईटातील भेद आणि मानवी मूल्ये ओळखायला शिकवा.
भावनेच्या आहारी किंवा रागाच्या भरात कोणताही अयोग्य निर्णय घेणे टाळा.
लोकांवर फार लवकर विश्वास ठेवू नका. विशेषतः अनोळखी लोकांवर.
वाईट संगत टाळा. चांगले काम लहान असो व मोठे त्यांना करण्यात कधीही संकोच करू नका.
प्रत्येकाकडे आपले दुःख सांगत बसू नका. वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.
लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका किंवा त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका. आपल्या मजबुरीला कमजोरी बनू देऊ नका.
कोणत्याही ढोंग, लोभ, मोहात पडू नका. संयम आणि विवेकाने वागा.
चांगले-वाईट यातील फरक समजून घ्यायला शिका. माणसे ओळखायला शिका.
स्वतःमुळे इतरांचे कितीही नुकसान झाले तरी स्वार्थी लोकांना फक्त स्वतःच्या फायद्याची काळजी असते. आजच्या काळात असत्यदेखील ठामपणे सत्य म्हणून विकले जाते. त्यामुळे दुनियादारीचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास लवकरात लवकर प्रशासन किंवा स्वयंसेवी संस्थेची मदत घ्या.

[email protected]