मोदी, भाजपवर टीका; डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापासून रोखले, विमानतळावर पुन्हा चौकशी

Dr. Sangram Patil Stopped at Mumbai Airport Over Criticism of PM Modi & BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात परखड मते मांडणारे हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी लंडनला परतण्यापासून रोखले आहे. विमान पकडण्यासाठी ते मुंबई विमानतळावर आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी सुरू केली.

मूळचे जळगावचे असलेले संग्राम पाटील हे ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. ते सोशल मीडियातही सक्रिय असतात. हिंदुस्थानातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर रोखठोक मते मांडत असतात. दोन आठवडय़ांपूर्वी ते कुटुंबीयांसह हिंदुस्थानात आले होते. त्यावेळी ‘लुक आऊट सर्क्युलर’च्या आधारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.

डॉ. पाटील यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केले होते. 19 जानेवारीला आपण लंडनला परतणार असल्याची माहितीही पोलिसांना दिली होती. त्याआधी ‘लुक आऊट सर्क्युलर’ मागे घेतले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले होते. मात्र, आज सकाळी विमानतळावर आले असता इमिग्रेशन काऊंटरवर त्यांना थांबवण्यात आले. लुक आऊट सर्क्युलर मागे घेतलेले नसल्याने तुम्हाला जाता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

काय आहे प्रकरण?

भाजपचा सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे याने डॉ. पाटील यांच्या विरोधात तक्रार केली होती. पाटील यांनी 14 डिसेंबर रोजी फेसबुकवर अपमानजनक, दिशाभूल करणारी व भाजपच्या नेत्यांविरोधात द्वेष पसरवणारी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप भामरे याने केला होता. त्या आधारे सायबर क्राइम विभागाने माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू आहे.