
छोट्या पडद्यावरील चार दिवस सासुचे, वादळवाट अशा गाजलेल्या मालिकांमधून झळकलेले अभिनेते म्हणजे डॉ. विलास उजवणे. चरित्र भूमिका असो किंव खलनायकाची भूमिका असो, त्या भूमिकांमधून ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते बनले. मात्र, गेला काही काळ ते गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यात अन्यही काही आजारांची भर पडली असून त्यांना आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.
ब्रेन स्ट्रोकनंतर उपचार करून पूर्ववत आयुष्य जगण्याच्या संघर्षात डॉ. उजवणे यांची आयुष्यभराची पुंजी खर्च झाली असून त्यांना पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सोशल मीडियावर डॉ. उजवणे यांना आर्थिक साहाय्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजू कुलकर्णी या फेसबुक युजरने हे आवाहन केलं असून त्यात डॉ. उजवणे यांच्या बँकेचे तपशीलही देण्यात आले आहेत. त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.
काही काळापूर्वी डॉ. उजवणे यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत होता. मात्र, त्यावरही मात करून ते पुन्हा उभे राहत होते. पण, त्यांच्या मार्गातील अडथळे अद्याप संपले नसून त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आहे. त्यात एका दुर्मीळ प्रकारच्या काविळीचीही भर पडल्याने डॉ. उजवणे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
.




























































