
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून नालेसफाई पूर्ण होत आली असून पूर्व उपनगरात काम पूर्ण झाले आहे. तर पश्चिम उपनगरातही 99.35 टक्के तर शहरात 99.93 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर एकूण 99.53 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाळय़ात पाणी तुंबण्याचा मनःस्ताप सहन करावा लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईत या वर्षी 6 मार्चपासूनच नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एक महिना नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 31 मे रोजी नालेसफाई पूर्ण करण्याच्या टार्गेटआधीच काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने 31 मेपर्यंत 979882.39 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यातील 975278.57 मेट्रिक टन गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे.
गोरेगावमधील कामाचा शिवसेनेकडून आढावा
गोरेगावमधील नालेसफाई कामाची पाहणी मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांनी पालिका अधिकाऱयांसोबत केली. यावेळी प्रेमनगर, शास्त्रीनगर व ओशिवरा नाल्यांची पाहणी करून शिल्लक सफाई कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पालिका अधिकाऱयांना दिल्या. तसेच मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर व सामंत वाडी या सखल भागातील नागरिकांना पावसाळय़ात पाणी साचून त्रास होऊ नये यासाठी तेथे उच्च क्षमतेचे पंप बसवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी दीपक सुर्वे, दिलीप शिंदे, अजय नाईक, राजू पाध्ये, लक्ष्मण नेहरकर आदी उपस्थित होते.




























































