
प्रसिद्ध मराठी नाटय़निर्माते संतोष कोचरेकर यांचे जुहू येथील घरी बुधवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
संतोष कोचरेकर नाटय़क्षेत्रात लहान-मोठी कामे करत निर्माते झाले. त्यांचे वडील नाना कोचरेकर कॉण्ट्रक्टने नाटकांचे शो घ्यायचे. त्यामुळे नाटकांचे बाळकडू संतोष यांना वडिलांकडून मिळाले. खुर्च्यांची व्यवस्था, प्रॉम्प्टिंगचे काम अशी पडेल ती कामे त्यांनी केली. संतोष कोचरेकर यांनी 1980 मध्ये ‘डबल गेम’ या नाटकाचे सहनिर्माता व्यवस्थापन केले. सई परांजपे यांच्या ‘माझा खेळ मांडू दे’ नाटकासाठी व्यवस्थापन केले. विनय आपटे यांची ‘गणरंग’ आणि ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या दोन्ही संस्थांनी मिळून अनेक नाटके रंगभूमीवर आणली. प्र. ल. मयेकर यांचे ‘रानभूल’ हे पहिले नाटक. ‘कुसुम मनोहर लेले’, ‘अभिनेत्री’, ‘सवाल अंधाराचा’, ‘तुमचा मुलगा करतोय काय’, ‘सत्ताधीश’ अशी नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘शुभ बोले तो नारायण’ ही त्यांची स्वतंत्र अशी पहिली नाटय़निर्मिती. त्यांची निर्मिती असलेले अजित भुरे दिग्दर्शित ‘मिस्टर नामदेव म्हणे’ नाटक फार गाजले. ‘ती तिचा दादला आणि मधला, ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’, ‘माझा बाप डोक्याला ताप’, जास्वंदी, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘कुसुम मनोहर लेले’ ही त्यांची नाटके यशस्वी ठरली.
प्रसाद कांबळी, विजय पेंकरे, सविता मालपेकर, अजित भुरे, सुकन्या मोने, संतोष पवार, देवेंद्र पेम, गोटय़ा सावंत, शेखर दाते, सुशील आंबेरकर, राहुल भंडारे, ज्ञानेश महाराव, संतोष काणेकर आदी नाटय़सृष्टीतील मंडळींनी संतोष कोचरेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.




























































