गुहेत अडकलेला फुटबॉल संघ सापडला, पण चार महिन्यांनी बाहेर येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बँकॉक

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकलेल्या थायलंडच्या संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघाचा तब्बल नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शोध लावण्यात यश आले आहे. परंतु थायलंडच्या अंडर-१६ संघातील या १२ फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकांना गुहेमधून बाहेर काढण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु एका आठवड्यापेक्षाही जास्त वेळ गुहेमध्ये गायब झालेले सर्व फुटबॉलपटू आणि त्यांचे प्रशिक्षक सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गुहेमध्ये अडकलेल्या फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी थायलंडचे सैन्य आणि देशातील व विदेशातील तज्ज्ञांनी मदत घेण्यात आली. फुटबॉलपटूंचा शोध लागल्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान थायलंडच्या सैन्यापुढे आहे. सैन्याच्या मते, गुहेमधून बाहेर पडण्यासाठी फुटबॉलपटूंकडे दोन मार्ग आहेत. एक त्यांना पोहून बाहेर यावे लागेल किंवा पावसामुळे गुहेमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहावी लागेल. परंतु दुसऱ्या पर्यायाला तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नऊ दिवस गुहेमध्ये अडकूनही सुदैवाने सर्वांचा जीव वाचला आहे. त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचा साठा असल्याने हे शक्य झाले. सध्या थायलंडचे सैन्य गुहेतील पाण्यामधून रस्ता शोधत फुटबॉलपटूंपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सैन्याकडून चार महिन्यांचा खाद्यसाठा फुटबॉलपटूंपर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे. कारण गुहेमध्ये पावसाचे पाणी साचले आहे आणि या पाण्याचा निचरा होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.