
सामना ऑनलाईन । पैठण
पैठण तालुक्यातील नवगाव या गावाला दुष्काळाच्या भयंकर झळा बसत आहेत. गोदावरी नदी कोरडीठाक पडली असून या गावातील महिला चक्क गोदापात्रात खड्डे खोदून पाणी शोधत आहेत. खड्डे खोदून जे गाळ मिश्रीत गढून पाणी येते त्या पाण्यावर सध्या या महिलां त्यांचा गुजराना करत आहेत.
पैठण तालुक्यात गोदाकाठी वसलेली १४ गावे आहेत. ‘गंगथडी’ या नावाने ओळखला जाणारा हा परिसर ऊसपट्टा म्हणूनही परिचित आहे. पैकी नवगावला नदीच्या पाण्यामुळे भरपूर ऊसक्षेत्र असल्याने हे गाव आर्थिक दृष्टीने आजही समृद्ध आहे. परंतु यावर्षी गोदावरी नदीचे अक्षरशः वाळवंटात रुपांतर झाले आहे. वाळुमाफीयांनी वाळुही ओरबाडून नेल्यामुळे जागोजागी खडक वर आलेले आहेत. काही जागी मुरमाड वाळु असलेले नदीपात्र दिसून येते. सर्वच जलस्रोत आटल्याने भयावह पाणीटंचाईच्या झळांनी नदीकाठचे हे संपन्न गाव होरपळून निघत आहे.
या पार्श्वभूमीवर या ईवल्याश्या गावात ‘पाणीविक्री’ जोरात सुरू आहे. जारविक्रीची चक्क ४ दुकाने थाटण्यात आली आहेत. २० लिटर जलक्षमतेच्या एका जारची किंमत १० रुपये एवढी आहे. पिण्यासाठी हेच पाणी संपूर्ण गाव वापरत आहे. ऊस-बागायतदारांंपासुन ते अगदी शेतमजूरही आपल्या कुटुंबासाठी दरमहा ४०० ते ५०० रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करत आहेत. अशी माहिती नवगाव येथील किशोर चौधरी या तरुण ऊस-ऊत्पादक शेतकऱ्याने दिली. पुर्वी जसा दुधाचा ऊकडा होता. तसाच आता पिण्याच्या पाण्याचा दर महिन्याचा ऊकडा लावला असल्याचे विदारक चित्र चक्क गोदाकाठावरील गावांमध्ये पाहायला मिळत आहे.
पाण्याची तहान कशीबशी भागवली जात असली तरी दररोजची आंघोळ, कपडे धुणे, नित्य वापरासाठी लागणारे पाणी तसेच गुराढोरांना लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र मोठा संघर्ष करावा लागत आहे. रखरखत्या ऊन्हात गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन खड्डे करून पाण्याचा शोध घ्यावा लागतो आहे. लहान बालकांपासून वयोवृद्ध ग्रामस्थ खड्यातून पाणी काढण्यात दिवसभर मग्न असतात. महिलांचा दिवसच पाणी मिळवण्यासाठी खर्च होतो आहे. नवगावसह गोदाकाठावरील पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, दादेगाव, आपेगाव, आगरनांदूर, ऊंचेगाव, टाकळीअंबड, घेवरी, तुळजापूर व हिरडपुरी या ‘गंगथडी’ च्या गावांना पाणीटंचाईचा विळखा पडला आहे.































































