भिडे पुलाजवळ बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेल्फी काढताना भिडे पुलानजीक वाहून गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यास एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. एकाचा मृतदेह नाना-नानी घाटाजवळ तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संगम ब्रिजजवळ आढळून आला आहे. सौरभ कांबळे (वय 20, रा. ताडीवाला रोड) आणि ओम तुपधर (वय 18) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत असताना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सौरभ व ओम हे दोघे भिडे पुलाजवळ नदीपात्रात उतरून फोटो काढत होते. त्यावेळी ओम वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी सौरभ पुढे गेला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने दोघेही वाहून गेले होते. अग्निशमन दल व एनडीआरएफ जवानांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. रविवारी सकाळी नाना-नानी पार्क घाटात सौरभचा मृतदेह आढळून आला. तर ओमचा मृतदेह संगमब्रिजजवळ नदीपात्रात सापडला आहे. दोघांची ओळख पटविण्यात आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.