
‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही’ अशी 10 वर्षांपासूनची सांगोला तालुक्यातील कट्टर शिवसैनिक, युवासेनेचे तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांची भीष्मप्रतिज्ञा अखेर पूर्ण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी मेटकरी यांना ‘मातोश्री’वर बोलावून चप्पल घालण्यास सांगितले. आज माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचे सांगत इतका, मोठा सन्मान फक्त शिवसेनेतच मिळत असल्याचे मेटकरी यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर सांगोला तालुक्यातील कट्टर शिवसैनिक, युवासेनेचे तालुका समन्वयक शंकर मेटकरी शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रचंड गर्दीत मेटकरी यांची चप्पल हरवली. त्याच वेळी मेटकरी यांनी ‘महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केली होती. 2012पासून गेली 10 वर्षे शंकर मेटकरी हे अनवाणी पायाने शिवसेना आणि युवासेनेचे काम करीत होते. 2019मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले. त्याच वेळी शंकर मेटकरी यांची प्रतिज्ञासुद्धा पूर्ण झाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनासारख्या महामारीने महाराष्ट्रावर घाला घातला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटता आले नाही. त्यानंतर संभाजीनगरच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यामार्फत शंकर मेटकरी यांना निरोप देऊन बोलाविले होते; परंतु मेटकरी यांना त्या-त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱया कट्टर शिवसैनिकाची भीष्मप्रतिज्ञा आठवणीत ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी शंकर मेटकरी यांना ‘मातोश्री’वर बोलावून घेतले. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत चप्पल घालण्यास सांगून जोमाने कामाला लागण्याचा आदेश दिला. ‘या आदेशाचे पालन करून शिवसेनावाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. आज मी खूपच आनंदी असून, माझ्या जीवनाचे सार्थक झाले असून, इतका मोठा सन्मान फक्त शिवसेनेतच मिळतो,’ असे मेटकरी यांनी सांगितले.





























































