किरकोळ कारणाने भररस्त्यात मोटारीतून उतरुन तरुणीला मारहाण

हॉर्न वाजविलेला ऐकू येत नाही का, अशी विचारणा करीत एका वाहनचालकाने दुचाकीस्वार महिलेला मारहाण करत तिचा गळा दाबल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावर घडली. त्यानंतर त्याने तरुणीचे डोके दुचाकीच्या हँडलवर आदळून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी 25 वर्षांच्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी 8 ऑक्टोंबरला हांडेवाडी रस्त्याने दुचाकीवरून जात होती. त्यावेळी पाठीमागून मोटारीतील व्यक्तीने त्यांना थांबविले. तुला हॉर्न वाजविलेला कळत नाही का , असे बोलून शिवीगाळ केली. त्यावेळी तरुणीने काय झाले अशी विचारणा केल्यानंतर आरोपीने मोटारीतून खाली उतरून तरुणीचे डोके दुचाकीच्या हँडलवर आपटले. आरोपीने तिचा गळा दाबला आणि मारहाण करत तिचा विनयभंग केला. घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या