मला पुरस्कार नको, पण गुरू धनकड यांना मात्र ‘द्रोणाचार्य’ द्या!

366

मी देशाला बॉक्सिंगचे सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत उतरलो होतो. दुर्दैवाने ते मी साकारू शकलो नाही, पण देशवासीयांसाठी ऐतिहासिक रौप्यपदक जिंकू शकलो याचा मोठा आनंद आहे. मला पुरस्कारांचा लोभ नाही. एकवेळ मला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, पण मला घडवणारे प्रशिक्षक अनिल धनकड यांना मात्र ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित केल्यास मला माझे यश भरून पावल्याचा आनंद होईल, असे कळकळीचे साकडे रशियातील जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा भीम पराक्रम करणारा बॉक्सर आणि हिंदुस्थानी नायब सुभेदार अमित पांघल याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला घातले आहे.

 धनकड सर यांनी मला सुरुवातीच्या काळात मुष्टियुद्धाचा श्रीगणेशा शिकवला. ते नसते तर मी लष्करात काम करून आज मुष्टियोद्धा बनलोच नसतो. 2008 मध्ये मी मुष्टियुद्धाचे धडे गिरवायला लागलो तेव्हा  धनकड सरच माझ्यासाठी सर्व काही होते. त्यांच्या शिकवणीला मिळालेला पुरस्कार हा मला मिळालेलाच पुरस्कार असे मी मानेन असे सांगून अमित म्हणाला, आजही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी मी धनकड सरांकडे मार्गदर्शनासाठी जातो. कारण त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

2005 पासून मी अमितला ओळखतो. तो एक जिगरबाज आणि प्रतिभाशाली मुष्टियोद्धा आहे आणि मला माझ्या मुलासारखाच आहे. देशाला आणखी गौरवाचे क्षण मिळवून देण्याची क्षमता अमितमध्ये आहे. त्याने माझ्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे.

 अनिल  धनकड, 

माजी राष्ट्रीय मुष्टियोद्धे आणि प्रशिक्षक

हिंदुस्थानी लष्करात नायब सुभेदार म्हणून काम करणारा 23 वर्षीय अमित पांघल सध्या मुष्टियुद्धाच्या क्षेत्रात जबर फॉर्मात आहे. आपला आवडता 49 किलो वजनी गट सोडून अमित 52 किलो या गटात चमक दाखवू लागला आहे. पण त्याच्या कामगिरीतली चमक आजही कायम आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या