ड्रोन उडवा, रोजगार मिळवा! सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी; मोफत प्रशिक्षणासह अधिकृत परवाना मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रोन बघितला की एक प्रकारचे कुतूहल निमार्ण होते. मात्र आता याच ड्रोनमुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ‘अमृत’ संस्थेच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मोफत प्रशिक्षणासह अधिकृत परवाना मिळणार आहे. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनचा वापर दिवसेंदिवस वाढत जात आहे. ग्रामीण भागात शेती, भूमापन, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध सरकारी प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. हे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात, मात्र आता या योजनेंतर्गत प्रशिक्षण चक्क मोफत दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जाणार आहे. १० दिवसांचा कोर्स अमृत संस्थेकडून मोफत दिला जाणार आहे.

प्रशिक्षणात काय शिकणार?

शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, सर्व्हे, सरकारी प्रकल्प निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन, नागरी विमान वाहतूक महासंचाल नालय अर्थात ‘डीजीसीए’ची सुरक्षित उड्डाण नियमावली, ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाणार आहे.

या आहेत अटी

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे.

उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी.

शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य.

वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला आवश्यक.