
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेनेच्या मागणीला अखेर यश आले असून राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यापैकी 112 तालुक्यात गंभीर स्वरुपाचा तर 39 तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. शिवसेनेने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलनं केली होती.
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा मोठा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पैठण, संभाजीनगर, वैजापूर रक्तपूर, गंगापूर या भागाला भेट दिली होती.
पाहा फोटो : दिवाकर रावते यांचा संभाजीनगरातील दुष्काळी भागाचा दौरा
दुष्काळ यादीत कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके, वाचा सविस्तर नावं…
जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्य तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पीकांची स्थिती या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यानुसार दुष्काळी तालुक्यांची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारपासून (31 ऑक्टोबर 2018) पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. आता अखेर राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.

































































