
सामना ऑनलाईन । मुंबई
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी जोगेश्वरीच्या अंबोलीमध्ये मोठी कारवाई केली. दोघा परदेशी ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळून तब्बल सहा कोटी किमतीचा कोकेन साठा हस्तगत केला.
अंबोलीच्या सिझर मार्गावरील शाळेजवळ दोन नायजेरियन ड्रग्ज तस्कर कोकेनची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची खबर वांद्रे युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक वाढवणे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डॅनियल इझिके (38) आणि जॉन फ्रान्सिस (35) हे दोघे तस्कर तेथे येताच पोलिसांनी दोघांवर झडप घातली. तेव्हा डॅनियलच्या अंगझडतीत 505 ग्रॅम वजनाचे व तीन कोटी तीन लाखांचे कोकेन सापडले तर जॉनच्या अंगझडतीत 500 ग्रॅम वजनाचे कोकेन मिळाले. अशा प्रकारे पोलिसांनी त्या दोघांकडून सहा कोटी तीन लाख किमतीचा एक हजार पाच ग्रॅम कोकेनचा साठी जप्त केला. पश्चिम उपनगरातील हाय प्रोफाईल नशेबाजांसाठी हा कोकेनसाठा आणण्यात आला होता. पण ते नेमका कोणाला देण्यात येणार होता याचा शोध घेत असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. दरम्यान, अंधेरी अंबोली ड्रग्ज तस्करांचे केंद्र बनू लागले आहे. यापूर्वी अंबोली पोलिसांनी धडक कारवाया करीत कोटय़वधींचा ड्रग्ज साठा जप्त केला होता तर अनेक ड्रग्ज तस्कर गजाआड केले आहेत.



























































