नवाब मलिक यांचा नवा गौप्यस्फोट, ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तीचा फडणवीसांसोबत फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूझ ड्रग्स प्रकरणात ( Drugs Case ) NCB प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित करणारे नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोख वळवला आहे. त्यांनी काही फोटो ट्विट केले आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस दिसत आहे.

या दोन वेगवेगळ्या फोटोत दोघांसोबत एक व्यक्ती उभा आहे. त्याचं नाव मलिक यांनी जयदीप राणा (Jaideep Rana) असल्याचं सांगितले आहे. माहिती नुसार राणा यांना जूनमध्ये NCB ने अटक केली होती.

जयदीप याच्या संदर्भात नवाब मलिक यांनी सांगितले की ड्रग्स तस्करी प्रकरणी तो तुरुंगात आहे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्याचे घनिष्ट संबंध आहेत. मलिक यांनी आरोप केला आहे की, ‘जयदीप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या रिव्हर अँथमचा प्रमख होता. फडणवीस यांच्या कार्यकाळातच ड्रग्सचा कारभार वाढला.’

समीर वानखेडे हेच या ड्रग्स रॅकेटचे प्रमुख आहेत, असा आरोपही त्यांनी केला. वानखेडे यांची नियुक्ती देखील फडणवीस यांनीच केली होती, असंही ते म्हणाले.

भाजप नेते राम कदम यांनी नवाब मलिक यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं आहे की सामाजिक जीवनात काम करताना हजारों-लाखों लोक फोटो काढून घेण्यासाठी येतात. त्यांनी विनंती केल्यावर अनेकदा टाळता येत नाही. तसंच फोटो काढून घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तो कोण आहे हे कधीही लिहिलेलं नसतं. त्यामुळे हा ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सांगितले की, ‘काल अरुण हालदार (राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष) समीर वानखेडे यांच्या घरी गेले होते. अरुण हालदार हे बहुदा भाजप नेते देखील आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यांनी पहिले चौकशी केली पाहिजे होती, मग सविस्तर रिपोर्च तयार करणं अपेक्षित होतं.’

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, समीर वानखेडे 14 वर्ष वेगवेगळ्या विभागात काम करत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली या विभागात केली. मुंबई आणि गोव्यातील काही जणांना ड्रग्सच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्न करण्यासाठी त्यांना या विभागात आणलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.