बेवड्याची सटकली, मी शंकराचा अवतार आहे म्हणत वृद्ध महिलेला मरेपर्यंत मारहाण केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने मी शंकराचा अवतार आहे म्हणत एका वृद्ध महिलेला मरेपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, 70 वर्षीय वृद्धेला एक व्यक्ती बेदम मारत आहे. छत्रीने मारतोय तर कधी लाथा मारताना तो दिसत आहे. अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पोलीसांनी त्याची चौकशी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याला तो शंकराचा अवतार असल्याचे वाटत होते. तो तिला मारून पुन्हा जिवंत करणार होता, असा दावा त्याने केला. मात्र त्याच्या या विक्षिप्त कृतीने एका निष्पाम महिलेचा जीव घेतला. प्रताप सिंग असे त्या आरोपीचे नाव असून त्याने 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो केवळ महिलेला मारतच नाही तर सतत स्वत:ला शंकराचा अवतार म्हणत आहे.

विशेष म्हणजे, ज्यावेळी ही व्यक्ती त्या वृद्ध महिलेला मारहाण करत होता त्यावेळी काही लोकं त्याचा व्हिडिओ बनवत होते. त्या वृद्धेला वाचवण्यासाठी कोणीही समोरून येण्याचे धाडस दाखवले नाही आणि फक्त व्हिडिओ बनवत राहिले. पोलिसांनी  आरोपीला पकडले असून दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. म्हणजेच एकूण चार जण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी अनेक वेळा तेच तेच सांगत होता. त्याने आधी महिलेला मारले, पण नंतर तिला जिवंत केले असा दावा तो करत राहिला. पीडितेच्या घरावर शोककळा पसरली आहे.