सुक्या कचऱ्याची विल्हेवाट, शहरात उभारणार तीन हायटेक प्लांट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांत स्वतंत्र हायटेक प्लांट सुरू करणार आहे. यासाठी खासगी कंपनीला पालिका जागा देणार असून त्यांच्यावर घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यामुळे लवकरच मुंबईतील सुक्या कचऱयाचा प्रश्न सुटणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये पालिकेकडून कचरा जमा केल्या जाणाऱ्या रहिवाशांपैकी बहुतांशी लोकांकडून ओला आणि सुक्या कचऱयाचे वर्गीकरण करण्यात येते, मात्र रहिवासी कचरा ओला व सुका कचरा वेगळा करीत असले तरी पालिकेच्या वाहनांमधून तो एकत्रितरीत्याच नेला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने स्वतंत्र एजन्सी नेमून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालिकेकडून ग्लोबल निविदा मागविण्यात आल्या होत्या, मात्र सध्या केवळ शहरासाठी ‘मेसर्स नेप्रा’ ही कंपनी पात्र ठरली आहे.

त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून शहरात लवकरच काम सुरू केले जाणार आहे. तर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुक्या कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती ‘स्वच्छ भारत अभियान’ समन्वयक आणि सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल ऍप
पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱया या उपक्रमात नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल ऍप सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना हे ऍप आपल्या मोबाईलवर ‘प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येणार आहे. या मोबाईल ऍपच्या माध्यमातून नागरिकांना उपक्रमाबद्दलची माहिती मिळणार असून संबंधित एजन्सीबरोबर संपर्क करून आपल्याजवळ जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी माहिती देता येणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.

असा राबवणार उपक्रम
कचरा विल्हेवाटीसाठी बनवण्यात येणाऱया प्लांटसाठी पालिका संबंधित कंपनीला पाच हजार स्क्वेअर मीटर जागा देईल. नियुक्त होणाऱया एजन्सीच्या माध्यमातून कचरा घरोघरी जाऊन गोळा करून विल्हेवाटीसाठी या प्लांटच्या ठिकाणी आणला जाईल. कचऱयाची वाहतूक, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असेल. गोळा केलेल्या कचरा विकून संबंधित एजन्सीला उत्पन्नही मिळवता येणार आहे. शहर विभागात हा उपक्रम राबविण्यासाठी ‘मेसर्स नेप्रा’ला कफ परेड येथे जागा देण्यात येणार आहे.