तपास यंत्रणाच भ्रष्टाचारात अडकली; ‘सीबीआय’चे डीएसपी देवेंद्र कुमार अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरातील अनेक महत्त्वाचे गुन्हे आणि भ्रष्टाचार प्रकरणांचा तपास करणारी महत्त्वाची सरकारी यंत्रणा ‘सीबीआय’ हीच लाचखोरीत अडकली आहे. सीबीआयचे सेकंड इन कमांड, विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याच प्रकरणात सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना आज अटक झाली. आता अस्थाना यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न विचारला जात आहे.

मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याकडून राकेश अस्थाना यांनी तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अस्थाना यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात हैदराबाद येथील उद्योगपती सतीश बाबू याने सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने 15 ऑक्टोबरला विशेष संचालक अस्थाना, सीबीआयच्या एसआयटीचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांच्यासह काही अधिकारी आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला. राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध सतीश बाबूने दिलेल्या जबाबात उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांनी फेरफार केली. आज सीबीआयने देवेंद्र कुमार यांना अटक केली. आता राकेश अस्थाना यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि उपसंचालक अस्थाना यांच्यात गेल्या काही महिन्यांत सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढय़ात देशातील महत्त्वाची तपास यंत्रणा आता भ्रष्टाचारात अडकली आहे.

पंतप्रधानांचा मांडवलीचा प्रयत्न फसला
सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने केंद्र सरकारही अडचणी आले आहे. म्हणूनच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घातले आणि प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा असे आदेश दिले, पण मांडवलीचा हा प्रयत्न फसला. कारण सीबीआय संचालक आलोक वर्मा यानी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर तासाभरातच अधीक्षक देवेंद्रकुमार यांना अटक झाली आणि इतर अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाडके, गुजरात कॅडरचे अधिकारी राकेश अस्थाना लाचखेरीत पकडले गेले आहेत. पंतप्रधानांकडून राजकीय बदला घेण्याचे हत्यार म्हणून सीबीआयचा वापर केला गेला. आता ही यंत्रणा स्वतःच भांडत आहे. एक यंत्रणा संपण्याच्या मार्गावर आहे.
– राहुल गांधी (काँग्रेस अध्यक्ष)

summary- dsp of cbi devendra kumar got arrested