
सामना प्रतिनिधी । मुंबई
जुलैच्या सुरुवातीस उधाणामुळे समुद्रातील अजस्र लाटांनी मुंबई किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले. या लाटांबरोबर समुद्रातील नऊ टन कचरा मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर जमा झाला. सांडपाण्यातील या कचऱ्यामुळेच मुंबईचा किनारा दूषित झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने शुक्रवारी हायकोर्टात दिली.
मुंबईतील सांडपाणी तसेच कचरा मोठय़ा प्रमाणावर दररोज समुद्रात सोडला जातो. परदेशात हा कचरा समुद्रात सोडण्यापूर्वी त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, परंतु मुंबई महापालिका अशी कोणतीही प्रक्रिया न करताच हा कचरा समुद्रात सोडते. त्यामुळे या कचऱ्याचे विघटन न होताच लाटेद्वारे मुंबईच्या किनाऱ्यावर हा कचरा जमा होतो असा आरोप करीत ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर ऍण्ड एज्युकेशन’ या संस्थेने ऍड. शेहजाद नक्वी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. महापालिका ६५५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी समुद्रात सोडले जाते असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या सुनावणीवेळी हायकोर्टात सादर केला होता. त्याप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने आज याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा
अद्ययावत स्वरूपाचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. सांडपाण्याच्या निचऱ्यासंदर्भात तसेच त्यावरील प्रक्रियेसंदर्भातील निकष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार बदलत असल्याने प्रकल्प अद्ययावत होऊ शकले नाहीत अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.


























































