गावी जाण्यासाठी टेम्पो चोरला, फास्टॅगमुळे टेम्पो चोर झाले गजाआड

टोल नाक्यावर वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी फास्टॅग प्रणाली सुरू केली आहे. याच फास्टॅगमुळे टेम्पो चोरांना वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राजकुमार हरिनारायण गौतम, पवन लालचंद शर्मा आणि संतोष मोतीराम रामबक्षी अशी त्यांची नावे आहेत. गावी जायला पैसे नसल्याने त्या तिघांनी टेम्पो चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

मूळचे हरयाणाचे रहिवाशी असलेले राजकुमार, पवन आणि संतोष हे गेल्या महिन्यात हरिद्वार येथे फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा त्याची ओळख झाली होती. ओळखीनंतर त्या तिघांनी मुंबईत फिरण्यासाठी येण्याचे ठरवले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर ते बॅण्ड स्टॅण्ड, पाली हिल परिसर फिरले. जिवाची मुंबई केल्यावर त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. ते वांद्रे परिसरात आले. तेथे त्यांना एक चावी लावलेला टेम्पो दिसला. घरी जाण्यासाठी त्यांनी तो टेम्पो चोरला. काही वेळाने टेम्पो मालक हा तेथे आला. टेम्पो चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली.

परिमंडळ-9चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विजय आचरेकर यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना टेम्पोवर फास्टॅग लावल्याचे दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला.