
अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तरुणांमध्येही अचानक मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ही बाब चिंताजनक असून त्यामागे प्रामुख्याने हृदयविकार आणि बिघडलेली जीवनशैली कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एम्स नवी दिल्ली येथे करण्यात आलेल्या अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूंच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इंडियन काwन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत करण्यात आलेल्या या अभ्यासात मे 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत शवविच्छेदनांच्या नोंदींचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार अचानक मृत्यू ठरविण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 8 टक्के प्रकरणे या निकषांत बसतात. त्यातील 57 टक्के मृत्यू तरुणांमध्ये आढळून आले. या तरुणांचे सरासरी वय 33.6 वर्षे असून पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.
अभ्यासानुसार, अचानक मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये हृदयविकार (42.6 टक्के) असून त्याखालोखाल श्वसनविकार (21.3 टक्के) आहे, तर अस्पष्ट कारणे (21.3 टक्के) आहेत. विशेष म्हणजे, कोविड-19चा थेट संबंध आढळून आलेला नाही, हेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तज्ञांच्या मते, तरुणांमध्ये धूम्रपान, मद्यसेवन, अनियमित झोप, ताणतणाव आणि बैठे जीवनमान यांसारख्या जीवनशैलीविषयक सवयी मोठा धोका ठरत आहेत. अभ्यासात तरुण मृतांपैकी 57 टक्के धूम्रपान करणारे, तर 52 टक्के मद्यसेवन करणारे असल्याचे निदर्शनास आले.
जीवनशैलीतील बदल हानीकारक
जीवनशैलीतील बदलांबरोबरीने वाढता तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. कामाचे अनियमित तास, वाढता ताण तसेच असुरक्षित जीवन यामुळे निर्माण होणारा तणाव झेलण्यास तरुण वर्ग कमी पडत असून त्यासाठी नियमित व्यायाम तसेच खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवण्याऐवजी धूम्रपान आणि अतिरिक्त मद्यसेवनाकडे हा तरुणवर्ग वळताना दिसतो. त्याचबरोबर अपुरी झोप हेही एक मोठे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आकडेवारीनुसार, अचानक मृत्यूंपैकी 55 टक्के घटना घरात, तर 40 टक्के घटना रात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडल्याचे दिसून आले. आठवड्याच्या मध्यकाळात या घटनांचे प्रमाण अधिक आहे.



























































