लखनौत मुसळधार पावसामुळे चार इमारती कोसळल्या, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे चार इमारती कोसळल्या असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. लखनौच्या गणेशगंज, अमीनाबाद, हुसैनाबाद आणि उदयगंज या भागात ४ इमारती कोसळल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत. अमीनागंजमध्ये एकाचा मृत्यू झाला असून हुसैनाबादमध्ये दोघांचा मृत्यू ओढवला आहे. लखनौमध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्याने गणेशगंज मध्ये एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर आहेत. कोसळलेली इमारत फार जुनी होती.

बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या बहुतांश जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तांसात जोरदार पावसाची शक्यता आहे.

या मुसळधार पावसामुळे राज्यात २३४ घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे महिन्याभरात १६५ लोकांचा मृत्यू झाला असून १३० जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकार्‍यांना पूरग्रस्त भागांचे दौरे करण्याचे तसेच धोकादायक इमारती खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

 

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखाची मदत जाहीर

या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ४ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत सरकारडून जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्री रिटा बहुगुणा यांनी ही माहिती दिली, तसेच जखमींचे उपचार मोफत करण्यात येणार असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण राबवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.