वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवा; शिक्षक भारतीची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

यंदाच्या शैक्षणिक वर्षात शासनाच्या धोरणानुसार 15 जूनपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. अनेक शाळांमध्ये आणि गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करीत कडक उन्हातून शाळेत ये-जा करावी लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रासही जाणवत आहे. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक भारतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या परिस्थितीचा गंभीर परिणाम होण्यापूर्वी शिक्षण विभागाने आपल्या अधिकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत आदेश करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव समीर परब यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांच्याकडे केली आहे.