दापोलीच्या मांदिवलीतील रस्ते झाले पाण्याची डबकी; अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

अवकाळी पावसामुळे दपोली तालुक्यातील मांदीवली गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून वाहन चालकांची वाहन चालवताना तारांबळ उडत आहे.

दापोली तालूक्यातील मांदिवली हे अतिशय महत्वाचे गाव आहे. या गावातून केळशी, उटंबर, आडे आंजर्लेकडून दापोली तालूका मुख्यालयाकडे येणारा महत्वाचा रस्ता आहे. आडे, उटंबर, केळशी परिसरातील गावांना पूणे-मुंबई शहराकडे जाण्यासाठी मांदिवली गावातूनच मुख्य राजमार्गाकडे जावे लागते. तसेच आमखोल, डौली आणि दापोलीकडे जाणारा दुसरा मार्ग सुद्धा मांदिवली गावातूनत जातो. या दोन्ही मार्गांच्या दृष्टीने मांदिवली हे मध्यवर्ती गाव आहे. या गावातूनच हे दोन्ही मार्ग जातात. मात्र याच मार्गावर बॉक्साईट खनिजाची अवजड वाहतूक केली जाते. वास्तविक पाहता अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी हा मार्ग योग्य नाही. तरीसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनीधी यांच्या आशिर्वादाने या मार्गावरून सर्रासपणे बॉक्साईट खनिजाची अवजड वाहतूक केली जात आहे. सतत या मार्गावरून डंपर धावत असल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रोवले, उंबरशेत, वांझळोली मार्गे मांदिवली गावातून पुढे मंडणगडकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहणांच्या वाहतुकीमुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवने जिकरीचे होत आहे. अशातच 13 मे आणि 16 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले आणि खड्ड्यांमध्ये गढूळ पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना या रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण जात आहे.